नवी दिल्ली – New Delhi
भूतकाळातील गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाल्यास ऑॅस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा सामना करायला आवडेल, असे मत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दिले आहे. एका चाहत्याच्या प्रश्नाला रोहितने हे उत्तर दिले.
मॅकग्रा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा गोलंदाज आहे. त्याने १२४ सामन्यांत ५६३ बळी घेतले आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याने ३८१ बळी घेतले. अचूक टप्प्यावरील गोलंदाजीसाठी ग्लेन मॅकग्राला ओळखले जात होते. २००७ च्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
दुसरीकडे, रोहित शर्माने सर्व स्वरूपात भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. गेल्या विश्वकंरडक स्पर्धेत त्याने ९ सामन्यात ५ शतके आणि एक अर्धशतक केले. रोहितने या स्पर्धेत ६४८ धावा केल्या आणि या स्पर्धेच्या इतिहासात ५ शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. एकदिवसीय संघाचा उपकर्णधार असलेल्या रोहितने आतापर्यंत २२४ एकदिवसीय सामने, १०८ टी २० आणि ३२ कसोटी सामने खेळले आहेत.