मुंबई | Mumbai
२२३ दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्वस्तात माघारी परतले. रोहित-विराटची फलंदाजी पाहण्यासाठी पर्थचे मैदान हाऊसफुल झाले होते. पण सर्वांचीच निराशा झाली. रोहित शर्मा फक्त ८ धावा काढून माघारी परतला. तर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. रोहित शर्माने पर्थमध्ये सुरु असलेल्या सामन्यात मैदानत पाऊल ठेवताच इतिहास रचला. मात्र त्याला या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
फलंदाजांसाठी आव्हानात्मक असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूडने जोश दाखवत रोहितला फक्त ८ धावांवर स्लिपमध्ये झेलबाद केले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलनंतर जवळपास २२३ दिवसांनी कमबॅक करताना रोहित शर्मा १४ चेंडूचा सामना करून माघारी फिरल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माने भारतीय एकदिसीय संघाचा नवा कर्णधार शुभमन गिलच्या साथीने संघाचा डावाला सुरुवात केली. डावातील तिसऱ्या षटकातील मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने एक खणखणीत चौकार मारला. पण त्यानंतर पुढच्या षटकात जोश हेजलवडूच्या उसळत्या चेंडूवर रोहित शर्मा स्लिपमध्ये झेलबाद झाला.
रोहित शर्माच्या नावावर ऐतिहासिक नोंद
भारतिय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने आज एक मोठे यश आपल्या नावावर केले आहे. तो भारतासाठी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पाचवा क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी हा टप्पा गाठला आहे. पण या खास सामन्यात रोहितला अवघ्या ८ धावांवर परतण्याची वेळ आली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




