अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्रात ग्रामीण पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणार्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (रोहयो) मोठ्या प्रमाणावर कामगारांची नोंदणी आहे. राज्यातील तब्बल 88 लाख जॉबकार्डधारक मजुरांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदवले आहे. मात्र, रोहयोमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुरू असलेल्या फेस ई-केवायसी प्रक्रियेत राज्यात कमी प्रतिसाद दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही अद्याप 42 टक्के मजुरांनी केवायसी केलेली नाही. जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार मंजूरांची ई- केवायसी होणे बाकी असून यामुळे त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
रोहयो कामांमध्ये पारदर्शकता आणि मजुरांच्या उपस्थितीची खात्री करण्यासाठी केंद्र शासनाने फेस ई-केवायसी बंधनकारक केली आहे. या प्रक्रियेत कामावर उपस्थित मजुरांचा थेट चेहर्याचा फोटो, लाइव्ह लोकेशन, जॉब कार्डवरील माहितीची पडताळणी असे सर्व टप्पे आवश्यक आहेत. फेस ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच मजुरांना कामाचे मानधन मंजूर केले जाते. गावोगावचे रोजगार सेवक व तांत्रिक सहाय्यक यांच्या मदतीने या मजुरांचा शोध घेऊन केवायसी करण्यात येत आहे. परंतु अनेक मजुरांना याबाबत माहितीच नाही. त्यामुळे केवायसी करण्यात अडचणी येत आहेत. ही फेस ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास मजुरांना मनरेगाचे काम आणि वेळेवर वेतन मिळणे या दोन्ही बाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे मजुरांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाने केले आहे.
दरम्यान, रोजगार हमी योजनेत बोगस मजुरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे यापुढे मजुरांची पारंपरिक हजेरी पद्धत बंद होणार असून, त्यांची उपस्थिती आता थेट फेस ऑथेंटिकेशन प्रणालीद्वारे नोंदवली जाईल. पारदर्शकतेसाठी केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून या नव्या निर्णयानुसार मनरेगातील सर्व जॉब कार्डधारकांना फेस ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खोट्या हजेरीला आळा
या अत्याधुनिक फेस-रीडिंग तंत्रज्ञानामुळे मनरेगा योजनेतील गैरव्यवहार आणि खोट्या हजेरीला प्रभावीपणे आळा बसेल. फेस ई-केवायसी प्रक्रिया आता सर्व जॉब कार्डधारकांसाठी सक्तीची असून, या ऑनलाइन ओळख पडताळणी प्रक्रियेत डिव्हाइसच्या कॅमेर्याद्वारे थेट लाइव्ह सेल्फी घेऊन तो रेकॉर्डमधील आधार कार्डाच्या फोटोसोबत जुळवला जाईल. यामुळे कामाच्या ठिकाणी उपस्थितीची नोंदणी अधिक पारदर्शक आणि अचूक होईल. परिणामी मजुरांना त्यांचे वेतन वेळेवर मिळेल.
अशी स्थिती
मजूर संख्या- 3 लाख 34 हजार 273
ई-केवायसी झालेले मजूर- 1 लाख 95 हजार 81
ई-केवायसी होणे बाकी 1 लाख 39 हजार
ई-केवायसी झालेली टक्केवारी : 58.45 टक्के





