टाकळीमिया |वार्ताहर| Takalimiya
राहुरी तालुक्यातील जातप परिसरात त्रिंबकपूर येथे सोमवारी सकाळी शेतात रोटाव्हेटरद्वारे शेत मशागत करत असताना रोटाव्हेटरमध्ये अडकून 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी, राहुल आदिनाथ हरिचंद्रे (वय 25) रा. त्रिंबकपूर हा आपल्या शेतात रोटा मारण्याचे काम करत असताना अचानक तो फिरत्या रोट्यात अडकला. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. घटना दिसताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र गंभीर अवस्थेमुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही. घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिकेतून मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
यावेळी सरपंच विलास कोळसे, पोलीस पाटील संदीप कोळसे, संदीप मुसमाडे, रावसाहेब मुसमाडे, नितीन मुसमाडे, ऋषिकेश मुसमाडे, अशोक हरिश्चंद्रे यांनी मदतकार्यात सहभाग घेतला. मयत राहुलच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे त्रिंबकपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




