Monday, November 25, 2024
Homeक्रीडाराऊंड द विकेट : जुने दुखणे

राऊंड द विकेट : जुने दुखणे

सगळे काही आलबेल आहे, असे वाटत असताना राजकोट एक दिवसीय सामन्यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. भारतीय संघ मालिका आधीच जिंकल्यामुळे प्रयोग करीत आहे, हे खरे असले तरी आमच्या संघाचा मोठा पराभव पुन्हा आपल्या जुन्या जखमा उघड्या करीत आहे.

भारताची तळाची फलंदाजी ही आमची मोठी डोकेदुखी आहे हे तर आता कोच राहुल द्रविडपासून सर्वांनी मान्य केले आहे, पण त्याच्यावर काही उपाय सापडला आहे असे दिसत नाही. या सामन्यात जडेजानंतर आमचे मोठे शेपूट सुरू झाले. कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण हे चारही जण फलंदाज म्हणून किती कुचकामी आहेत हे वेगळे सांगायला नको. म्हणजे जडेजा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा भारताची फलंदाजी लौकिकार्थाने संपल्यात जमा होती.

- Advertisement -

Gautami Patil : गौतमी पाटीलवर नगरमध्ये गुन्हा दाखल; काय आहे कारण?

वॉशिंग्टन सुंदरला आघाडीला पाठवल्यावरसुद्धा ही परिस्थिती तर तो खाली आल्यावर काय होणार? विकेट काढायला आपल्याला अक्षर पटेलच्या अनुपस्थितीत आश्विनला घ्यावेच लागणार! वॉशिंग्टनची ती कुवत नाही. त्याला का खेळवतात हा प्रश्नच आहे. पुढचे चार, मग त्यात कधी प्रसिद्ध तर कधी शामी असेल. शेपूट भले मोठे आणि बिनकामाचे होणारच! निव्वळ हे ठिगळ लपवण्यासाठी शार्दूल ठाकुरला घ्यायचे तर त्याचा फलंदाज म्हणून वकुब किती? गेल्या काही सामन्यात त्याच्या बॅटने असे काय केले आहे की त्याला लॉर्ड म्हणावे?गोलंदाजीत तो यथातथाच आहे. त्याच्यासाठी शामीला बेच गरम करावा लागतो हा मात्र विनोद ठरावा. मला वाटते, शार्दूलला पर्याय नाही हीच आमची खरी गोची आहे. याचा अर्थ अक्षरची दुखापत आमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते.

आमच्या पहिल्या सहा फलंदाजांत म्हणजे रोहित, शुबमन, विराट, ईशान किंवा सूर्या आणि श्रेयस व राहुल यापैकी एक जणही फिरकीची चार षटके  टाकू शकत नाही ही आमची शोकांतिका आहे. केएल व ईशान विकेट किपर आहेत म्हणून त्यांना सोडून देऊ, पण हार्दिकशिवाय बाकीच्यांचे काय? हार्दिकलाही दहा षटकांचा भार पेलवणार आहे का? या उलट ऑस्ट्रेलियाकडे अष्टपैलू फलंदाजांची फौज आहे. ग्रीन, स्टोईनीस, मॅक्सवेल, मिच मार्श हे तर अष्टपैलू आहेतच, पण कर्णधार कमिन्स काही कमी नाही.

वेळ पडली तर शॉर्ट ऑफस्पिन टाकतो आणि लबुशेन लेगब्रेक टाकतो. तेज गोलंदाज अबोट बॅटिंग करतो. स्टार्कही हाणामारी करतो. इंग्लंडकडे असेच पार्ट टाइमर बरेच आहेत. टॉप संघ आणि आमचा संघ यात मोठ्ठा फरक हाच आहे. २०११ ला आम्ही जिंकलो तेव्हा युवराजचे अष्टपैलूत्व कामी आले होते. सचिन, सेहवाग, रैना वेळ आली तर स्पिनर म्हणून गोलंदाजी करीत होते. स्पर्धा तोंडावर आली असताना आणि बहुतेक खेळाडू फॉर्मात आले असताना आमच्या या ‘जुन्या’ दुखण्याने पुन्हा उचल खाल्ली आहे.

– डॉ. अरुण स्वादी

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रसिद्ध अभिनेत्याकडून सेन्सॉर बोर्डातील भ्रष्टाचाराची पोलखोल; एकनाथ शिंदेंना टॅग करत म्हणाला, “चित्रपटासाठी ६.५ लाख…”,

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या