नागपूर | Nagpur
आज विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये विजयादशमीच्या दिवशी झाली होती. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नागपुरातील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कोविंद यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी संघस्वयंसेवकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले ५० टक्के टॅरिफ (आयात शुल्क) आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आत्मनिर्भर भारताचा संकल्प, त्यासह दिलेला स्वदेशीचा नारा यावर भाष्य केले.
रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांना नमन केले. संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने शस्त्र पूजन केले. या विजयादशमी उत्सवात घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके, यूएसए यांसारख्या विविध देशांतील अनेक विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले होते.
आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल
सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशीमबागेतून संबोधन करताना अनेक विषयांवर भाष्य केले. त्यात त्यांनी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफवरही भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “नुकतेच अमेरिकेने जाहीर केलेले धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. एकटा देश स्वतंत्रपणे वाटचाल करू शकत नाही. पण हे अवलंबित्व नाईलाजात बदलता कामा नये. कारण ही आर्थिक प्रणाली कधी बदलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल. त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे जतन करावे लागेल, पण त्यात नाईलाज नसावा, सक्ती नसावी, आपली इच्छा असायला हवी.”
सरसंघचालक म्हणाले, “आर्थिक क्षेत्रात आपण पुढे जात आहोत. तरुण उद्योजक देशाला पुढे नेत आहेत. त्यांच्याकडे खूप जोश व उत्साह आहे. परंतु, विकासाच्या प्रचलित पद्धतीने श्रीमंत व गरिबांमधील अंतर वाढते. आर्थिक सामर्थ्य हे काही मोजक्या हातांमध्ये एकवटते. पर्यावरणाची हानी होते अमानवीयता वाढते. त्यामुळे आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागेल.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




