नागपूर | Nagpur
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवातील भाषणात देशातील आंदोलनांवर आणि सत्ताबदलाच्या मागण्यांवर भाष्य केले. फ्रान्स, अल्बानिया, नेपाळ आणि बांगलादेशमधील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी केवळ सरकार बदलल्याने देशातील प्रश्न सुटतातच असे नाही, असे मत मांडले. भारतातही अशाच प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी समाजातील मतभेद आणि असंतोषाचा वापर देशाला कमकुवत करण्यासाठी केला जात असल्याचा दावा केला.
नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात भागवत बोलत होते. संघाच्या १०१व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी देशाची जागतिक भूमिका, सामाजिक एकता, तरुण पिढी, आंदोलनांचे स्वरूप आणि भारतासमोरील आव्हाने यांवर विचार मांडले.
मोहन भागवत म्हणाले की, पश्चिमेकडून एक ‘वादळ’ उठले आहे आणि त्याबाबत सावध राहणे आवश्यक आहे. कारण फ्रान्स आणि अल्बेनियामध्ये घडणाऱ्या घटना जग पाहत आहे आणि भारतातही असेच प्रयत्न केले जात आहेत. परंतु अशा प्रकारच्या अयोग्य वर्तनाला भारतात स्थान नसावे. लोकशाहीत निदर्शने होणे ही एक स्वाभाविक गोष्ट असली, तरी त्यावर उपाय समाजातूनच शोधले पाहिजेत. कोणत्याही निदर्शनाचा उद्देश हा तोडगा काढणे हाच असावा. काही लोक केवळ स्वस्त लोकप्रियतेसाठी इतरांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतात, असा आरोप भागवत यांनी केला.
समाजातील सर्व समस्यांचे निराकरण केवळ शासन करू शकते किंवा केवळ आंदोलनांतूनच उपाय निघू शकतात, असे नाही. समाजाचा सक्रिय सहभाग आणि परस्पर संवादातूनही प्रश्न सुटू शकतात, असे भागवत यांनी नमूद केले. आंदोलनामागे देश आणि समाज आपला आहे, त्याच्या व्यवस्थेची जबाबदारी आपलीही आहे, ही भावना असावी. मात्र, आंदोलन राजकीय हत्यार बनल्यास आणि अन्यायाची भावना सातत्याने भडकवून व्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण केल्यास त्याचा फायदा देशाला दुबळे करू इच्छिणाऱ्या शक्तींना होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. समाजात परस्परांविषयी संशय आणि कटुता वाढविण्याऐवजी संवादातून जुन्या गाठी सोडविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. छोट्या घटनांवरून चिथावणी देऊन संघर्ष निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मोहन भागवत म्हणाले की, आपण भारताचे लोक एक आहोत. आपली एकता नैसर्गिक आहे आणि ती हृदयापासून निर्माण होते. हा कोणताही व्यवहार किंवा करार नाही. ही कोणतीही अटींवर आधारित अशी व्यवस्था नाही, जिथे कोणी असे म्हणू शकेल की, ‘जर मला बदल्यात काही मिळाले तरच मी भारताचा आहे, अन्यथा नाही.’ खरं तर आपली एकता बिनशर्त आहे. भारताकडून आपल्याला काही मिळो किंवा न मिळो, आपल्याकडे जे काही आहे, ते सर्व भारताचेच आहे. जेव्हा आम्ही संघामध्ये ‘हिंदू भावने’ला बळकट करण्यासाठी एक संघटित आणि सशक्त हिंदू समाज घडवण्याबद्दल बोलतो, तेव्हा त्याचा अर्थ इतर धर्मांबद्दलचा परस्पर आदर किंवा राष्ट्रीय एकता यांच्या विरोधात जाणे असा अजिबात नाही.
नेपाळमध्ये नैसर्गिक संकट आले. ते का आले असा विचार होणे आवश्यक
नेपाळमध्ये नैसर्गिक संकट आले. ते का आले असा विचार होणे आवश्यक आहे. संपूर्ण हिमालय क्षेत्रात असे संकट येत आहे. विकास प्रक्रिये ची योग्य दृष्टी निर्माण करण्याची आवश्यक आहे. विकासाच्या नावाखाली विकास करणारा मनुष्यचं राहणार नाही अशी स्थिती येऊ नये.
एकतेचे तत्व अटल आणि श्वाश्वत, आपल्या ‘स्व’बोधाचा पाया
आपल्या देशाच्या संविधानातील उद्देशिकेमध्ये आपण स्वतःला ‘आम्ही भारताचे लोक’ असे संबोधले आहे. विविधता असूनही भावनिकदृष्ट्या एकात्म असलेल्या समाजाचे हे प्रतीक आहे. हे भावनिक बंध अधिकाधिक दृढ कसे करावेत, याचे मार्गदर्शनही संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमधून स्पष्टपणे मिळते. या भावनिक एकात्मतेची प्रत्यक्ष अनुभूती ज्या तत्त्वामुळे प्राप्त होते, ते तत्त्व आणि त्याचे स्पष्टीकरण करणारे जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आपल्याकडे असतानाही आपले आचरण त्यापासून पूर्णपणे वेगळे आणि हीन झाले. परिणामी, विश्वगुरूच्या स्थानावरून आपली घसरण होत गेली आणि अनेक शतके आपल्याला पारतंत्र्य भोगावे लागले. असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.




