Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकरच; नियुक्तीचं गॅझेट जारी

Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकरच; नियुक्तीचं गॅझेट जारी

मुंबई | Mumbai
राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू होण्याआधी राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत होते. रुपाली चाकणकर यांची आमदारकीची संधी हुकली असली तरी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आलीय. येत्या २२ तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र तत्पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा रुपाली चाकणकर यांच्याकडे सोपवण्यात आली. चाकणकर यांच्या नियुक्तीचं गॅझेट नुकतच प्रसिद्ध करण्यात आले.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांपैकी सात आमदारांचा काल शपथविधी पार पडला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याची चर्चा होती. पण छगन भुजबळांनी आपल्या मुलासाठी हट्ट धरल्याने मग रूपाली चाकणकर यांचे नाव मागे पडले. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी विचारला होता. राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीत चाकणकर यांचे नाव नव्हते. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात निवडणुकीनंतर सत्ताबदल झाला तरी रुपाली चाकणकर यांचं पद मात्र कायम राहील. रुपाली चाकणकर या पुढची तीन वर्षे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. प्रोटोकॉलनुसार या पदाला राज्यमंञीपदाचा दर्जा आहे.

- Advertisement -

कोण आहेत रुपाली चाकणकर?
रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या