पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील वाद थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर असंवेदनशील वक्तव्य केले होते. त्यावरुन रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यात वाक् युध्द सुरु आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत असून एकाच पक्षातील दोन महिला नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वादावर अजित पवारांनी देखील बोलणं टाळले होते.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेले नाही. याआधी अजित पवारांनी त्यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी केली होती. प्रवक्तेपदानंतर आता स्टार प्रचारकांच्या यादीतही स्थान देण्यात आले नसल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांचा संताप झाला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता आपल्या रोखठोक स्वभावाला जागत सगळेच राजकीय पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे.
रुपाली पाटील आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे ७ दिवसांच्या आत करावा असे पत्र सरचिटणीस यांच्याकडून पाटील यांना देण्यात आले होते. त्यावरून रुपाली पाटील यांनी नेमके कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे. असा सवाल उपस्थित करत प्रदेश कार्यालयाला खुलासा पत्र पाठवले आहे.
रुपाली ठोंबरे पाटील नेमके काय म्हणाल्या?
पक्षाने मागितलेल्या खुलासा पत्रामध्ये, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे. त्याबाबत आपणास खुलासा येणे प्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत.
त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते. त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षाला सुद्धा रोषाला सामोरे जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटूंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते. त्यावेळी देखील मा. दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते. मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्तभंग झालेला नाही.
रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्वत:च्या पक्षाकडेच खुलासा मागितल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर पक्ष नेतृत्वाकडून कसा तोडगा काढला जातो, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




