अहिल्यानगर | बद्रीनारायण वढणे
सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात 1 जानेवारी, 2025 ते 10 एप्रिल, 2025 या 100 दिवसांच्या कालावधीत महा आवास अभियान 2024-25 राबविण्यात येत आहे. याची जोरदार तयारी सुरू असून राज्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येकी किमान एक याप्रमाणे बहुमजली इमारती (ॠ + 1 ते ॠ + 4), हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंट उभारण्यात येणार आहे. या कामाला गती यावी यासाठी लायन्स क्लब, रोटरी क्लब यासारख्या स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने, दूध संघ, यासारख्या सहकारी संस्था, खासगी संस्था, तंत्र शिक्षण संस्थांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात उत्कृष्ट काम करणार्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार देऊनही गौरविण्यात येणार आहे.
सर्वांसाठी घरे या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान 2024-25 राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, घरकुलांना उद्दिष्टांप्रमाणे 100 टक्के मंजुरी देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरित करणे, सर्व मंजूर घरकुले भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, बहुमजली इमारती, गृहसंकुले व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी करणे, डेमो हाऊसचा प्रभावी वापर करणे, शासकीय योजनांशी कृतीसंगम करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर डेमो हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध मार्गांनी उपलब्ध होणार्या जागांची ‘लॅण्ड बँक’तयार करण्यात येणार आहे.
सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरीता वाळू उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटात किमान एक याप्रमाणे ‘सॅण्ड बँक’ ची निर्मिती करणे. राज्यात महिला स्वयंसहायता गट/ग्राम संघ/प्रभाग संघ/विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था/शेतकरी उत्पादक कंपनी, इ. समुदाय आधारीत संस्थाद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक‘घरकुल मार्ट’ सुरू करून त्याद्वारे घरकुलाचे बांधकाम साहित्य जसे दगड, विटा, वाळू, सिमेंट, दारे, खिडक्या, छताचे साहित्य, इ. विक्रीसाठी उपलब्ध करणे.घरकुलांचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्थांच्या समन्वयातून गरजेप्रमाणे इच्छुक लाभार्थ्यांना गृहकर्ज मिळवून देण्याची प्रक्रिया सुलभ करणे. क्रश सॅण्ड, सिमेंट ब्लॉक, फ्लाय अॅश ब्रिक्स, इंटर लॉकींग ब्रिक्स, हॉलो ब्रिक्स, इत्यादींचा वापर वाळूला पर्याय म्हणून करण्यात येणार आहे. किमान 10% घरकुल बांधकामामध्ये फरशी/लादी, रंगरंगोटी, किचन गार्डन/परसबाग, रेन वॉटर हार्वेस्टींग, सौरउर्जा साधने व नेट बिलींग, इ. चा वापर करून ‘मॉडेल हाऊसेस’ उभारण्यात येईल
जिल्हास्तरीय कार्यशाळाः राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 8 जानेवारी, 2025 ते 14 जानेवारी, 2025 या कालावधीत पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली तसेच. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प), सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण), उप जिल्हा कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ) यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळांत जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, उपसभापती, गट विकास अधिकारी, तहसिलदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी, तालुकास्तरीय डाटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, बँक प्रतिनिधी, मिडीया प्रतिनिधी, इ. यांना अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदर कार्यशाळेस विभागस्तरावरील अधिकारी हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील.
तालुकास्तरीय कार्यशाळाः राज्यातील जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 15 जानेवारी 2025 ते 21 जानेवारी, 2025 या कालावधीत तालुक्याचे मा. आमदार यांचे अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी, तहसिलदार यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. या कार्यशाळांत तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समिती कार्यालयातील संबंधित अधिकारी/कर्मचारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, बँक प्रतिनिधी, मिडीया प्रतिनिधी, इत्यादींना अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदर कार्यशाळेस जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील.
ग्रामस्तरीय कार्यशाळा: राज्यात सर्वत्र दिनांक 22 जानेवारी, 2025 ते 28 जानेवारी, 2025 या कालावधीत गावस्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामस्तरीय कार्यशाळा आयोजित करुन त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी हे अभियानाबाबत सखोल मार्गदर्शन करतील. या कार्यशाळाद्वारे महा आवास अभियान 2024-25 चे यशस्वी अंमलबजावणीसाठी मिळालेली माहिती सर्व लाभार्थी यांना देवून गावातील गतिमान अंमलबजावणीबाबतचे नियोजन करण्यात येईल. सदर कार्यशाळेस तालुकास्तरावरील संपर्क अधिकारी हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील. या ग्रामस्तरीय कार्यशाळेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘ग्राम कृती गटाचे गठन’ करण्यात येणार आहे. या योजनेसाठी वित्तीय संस्थांकडून गृहकर्ज मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय स्तरीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय सनियंत्रण व मूल्यमापन समिती स्थापन करण्यात आली आहे. महाआवास अभियान 2024-25 कालावधीसाठी उत्कृष्ट कामे करणार्या राज्यस्तरीय, विभागीय स्तरीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील संस्था आणि व्यक्तींना महा आवास अभियान पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.
- ‘सॅण्ड बँक’ ची निर्मिती करण्यात येणार
- ‘घरकुल मार्ट’ सुरू करून बांधकाम साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होणार
- 8 ते 14 जानेवारी या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यशाळा
- 15 ते 21 जानेवारी कालावधीत तालुकास्तरीय कार्यशाळा
- 22 ते 28 जानेवारी कालावधीत गावस्तरावर कार्यशाळा