नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रशिया आणि युक्रेन युद्धाकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले असून हेही युद्ध थांबावे अशी भारतसह जगभरातील अनेक देशांची इच्छा आहे. त्याच अनुषंगाने रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भेट होऊन चर्चा झाली होती. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये युध्दावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली, पण अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत सुचक वक्तव्य केले होते. “रशियाबाबत मोठी प्रगती, संपर्कात राहा” असा संदेश असणारी ही पोस्ट ट्रम्प यांनी केली होती. त्यामुळे पुतीन आणि ट्रम्प यांच्यात काही सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर आता व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन या चर्चेसंदर्भात माहिती दिली आहे. अलास्का येथे पुतीन आणि ट्रम्प यांच्यात भेट होऊन युध्दजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली होती. या चर्चेनंतर पुतीन यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून सांगितले आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, “आताच मित्र राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी अलास्कामध्ये झालेल्या अलिकडील भेटीची आणि चर्चेची माहिती दिल्याबद्दल पुतिन यांचे आभार. भारताने युक्रेन संघर्षाचे शांततापूर्ण मार्गाने निराकरण करण्याचे सातत्याने आवाहन केले आहे आणि या संदर्भातील सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात देवाणघेवाणीची अपेक्षा करतो,” असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
पुतिन यांचा हा फोन यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज रात्री युरोपीय नेते झेलेन्स्कीसह वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांना भेटणार आहेत. भारत आणि रशियामधील मैत्री आणि व्यापारामुळे अमेरिकेने भारतावर मोठे शुल्क लादले आहे. भारत हा रशियाचा मोठा भागीदार आहे, म्हणूनच बैठकीनंतर युरोपियन नेत्यांनी घेतलेला निर्णय रशिया आणि भारतावरही परिणाम करू शकतो.
अमेरिकेसोबतच्या संबंधात तणाव
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध थोडेसे तणावग्रस्त आहेत. त्यातच, अमेरिका आणि भारत यांच्यात 25-29 ऑगस्टपर्यंत व्यापार करारावर चर्चा होणार होती. मात्र, एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेचे शिष्टमंडळ व्यापार करारासंदर्भातील पुढील बैठकीसाठी येणार नाही. अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून नवी तारीख निश्चित केली जाईल, असे सांगितले जातेय. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत पाच वेळा चर्चा झालेली आहे. सहाव्या फेरीच्या चर्चेसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात येणे अपेक्षित होते. मात्र, सध्या ते लांबणीवर पडले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





