नागपूर | Nagpur
विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून महायुतीला मोठे यश मिळाले. 5 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये महायुतीचा मंत्रिमडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. मात्र, दुसरीकडे मंत्रिपद मिळाले न मिळाल्याने अनेकजण नाराज असल्याचे बघायला मिळतेय. महायुतीतील तीनही पक्षांतील ईच्छुक आमदारांना मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र यंदा अनेकांची मंत्रीपद न मिळाल्याने निराशा झाली आहे. यामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत ही आहे. सदाभाऊ खोत यांनीही त्यांच्या मनातली नाराजी जाहीर केल्याचे बघायला मिळत आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत?
सदाभाऊ खोत म्हणाले की, मित्र पक्षाना सामावून घेणे हे तिन्ही पक्षांनी गरजेचे होते. एका पक्षाने घेतले पाहिजे, असे मी म्हणणार नाही. तिन्ही पक्षांनी मित्र पक्षांसाठी काही मंत्रिपदे बाजूला काढायला पाहिजे होती. परंतू दुर्देवाने तसे झाले नाही. गावगाड्यामध्ये पेहरा केला जातो शेतामध्ये काम करत असताना. तुझं दोन एकर नांगरून दिलं तर माझं ही अर्धा एकर नांगरून दे अशी गावातील मन आहे. मात्र, दुर्देवाने असे झाले की, आम्ही प्रामाणिकपणे तिन्ही पक्षांचे शेत नांगरून दिले पण ज्यावेळी आमचे शेत नांगरायची वेळ आली, त्यावेळी आमच्या शेतात बैलाला धारही मारू दिली नाही. बैलासोबत गडी घेऊन गेले आणि आम्ही आपल शेतात उभे आहोत.
२४० लोक आपले निवडून आले आहेत, मंत्रिपदे देण्याला काही मर्यादा होत्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कालांतराने ही सगळी मंडळी कामात येतील. शेतकरी एखाद्या वर्षी शेत पिकले नाही म्हणून पेरणी करायचे थांबत नाही. दुसऱ्या वर्षी पेरणी होतीय का हे बघत राहायचे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र यावेळी मंत्री होता न आल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
आमदार रवी राणा, नरेंद्र भोंडेकर नाराज
युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील नाराज असल्याचं समोर आले आहे. ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील मंत्रिपद न मिळाल्याने खदखद पाहायला मिळाली. नरेंद्र भोंडेकर यांनी वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन, असे म्हटले. प्रकाश सुर्वे यांची नाराजी देखील लपून राहिली नाही. तानाजी सावंत देखील नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यांच्या कार्यालयाने तानाजी सावंत आरोग्याच्या कारणामुळे नागपूरहून निघाल्याचे म्हटले.