Saturday, November 23, 2024
Homeनगरमाझ्या पराभवाला कुणीही जबाबदार नाही - लोखंडे

माझ्या पराभवाला कुणीही जबाबदार नाही – लोखंडे

पराभव झाला तरी यापुढेही शिर्डीत राहून जनतेच्या कामांना प्राधान्य देणार

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह पिचड, आ. लहामटे, आ. काळे, कोल्हे, मुरकुटे यांनी आपल्या विजयासाठी मेहनत घेतली. मात्र आपला पराभव झाला असला तरी यापूर्वी दहा वर्षे खासदार म्हणून कधीही मुजोरपणा केला नाही. आता हरलो तरी नाराज न होता जनतेच्या कामांना प्राधान्य देवून ते सोडवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे शिर्डीतील महायुतीचे पराभूत उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

शिर्डीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्री. लोखंडे म्हणाले, माझ्या पराभवाला कोणीही जबाबदार नाही. खासदार म्हणून आपण कोठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून आपले काम केले. दहा वर्षात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचवण्यात आपण कमी पडल्याने आपला पराभव झाला. 45 वर्षे रखडलेल्या निळवंडेच्या कामासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. मतदार संघातून कांदा निर्यातबंदीसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना भेंटून केलेल्या प्रयत्नांना यश आले. नाफेड मा़र्फत कांदा ख़रेदी केंद्र सुरू करूनही विरोधकांकडून याबाबत चुकीची माहिती पसरवण्यात आल्याने कांदा उत्पादकांच्या रोषाला या निवडणुकीत सामोरे जावे लागले. मात्र आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या कामांच्या पुर्ततेसाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहोत.

शिर्डीत आपला पराभव झाला असला तरी आगामी काळात जनतेच्या सेवेसाठी आपण शिर्डीतच थांबणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर प्रेम करून आपल्या विजयासाठी खुप मेहनत घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही आपल्या विजयासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मतदार संघात अनेक बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सक्रीय केले. काळे, कोल्हे, पिचड, लहामटे आदी एकाच व्यासपिठावर आले. मात्र मतदारांनी किती ऐकले याबाबत शंका आहे. आपल्या पराभवाबद्दल आपण कोणत्याही नेत्याला दोष देणार नाही. मी कुठे कमी पडलो याची कारणे आपण शोधणार असल्याचे लोखंडे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष भगिरथ होन, नितीन कापसे आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या