Tuesday, February 3, 2026
Homeनगरसद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा महाकुंभ एकाच छताखाली - महंत रामगिरी

सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा महाकुंभ एकाच छताखाली – महंत रामगिरी

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgav

सरकारच्या अर्थसंकल्पात कुंभमेळ्यास बजेट तयार केलेले असते, त्यामध्ये वेगवेगळ्या आखाड्यांचे फड आणि आखाडे असतात. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सुरु केलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा लाखोंच्या जनसमुदायाचा हा महाकुंभ एकाच छताखाली पंचक्रोशीतल्या गावोगावच्या भाविकांच्या देणगीतून आणि त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व परिश्रमातून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

- Advertisement -

शनिदेवगाव सप्तक्रोशी येथे सुरू असलेल्या 178 व्या सप्ताहाच्या चौथ्या दिवशीच्या प्रवचनात भाविकांना उपदेश करताना ते बोलत होते. भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचनातील तिसरे पुष्प गुंफताना महाराज पुढे म्हणाले, भगवंत भक्ताची जात बघत नाही; जो भक्त भगवानाची भक्ती करतो, त्याला तो प्राप्त होतो. सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. एखादी वस्तू अतिदूर असली तर ती दिसत नाही; डोळ्यातील अंजन स्वतःला दिसत नाही, त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही. पण गंगागिरी महाराजांच्या भजनात मनुष्याच्या जीवनात समाधान मिळते. आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे. गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातून अनेकांचे व्यसन नष्ट झाले. स्वातंत्र्यपूर्व काळातही महाराजांनी अनेक अडचणींना सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवला.

YouTube video player

आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे.व्यसनाधीन झाला आहे, त्याबरोबरच संपत्ती, सत्ता, संतती हे देखील व्यसनातील प्रकार आहेत. याच्या पाठीमागेच समाज लागलेला आहे. आणि बिघडलेला आहे. म्हणून या समाजाला खर्‍या अर्थाने शांती मिळत नाही. चाळीस टक्के समाज थोडा आहे; तो कुठेतरी याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं म्हणून विचार करतो, पण तोही दिशाहीन आहे, त्याला योग्य दिशा मिळत नाही. नेमकं मी काय करायला पाहिजे? माझं चांगलं वागण्याकरिता, माझं जीवन स्वच्छ आणि सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे? असा दिशाहीन समाज झाला आहे. अध्यात्मात आल्यास भजन-कीर्तन न आले तरी चालेल, परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही. शास्त्र हे नित्य नवीन असून, त्यामुळेच युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणांना चांगली दिशा मिळेल. अशा दिशाहीन समाजाला योग्य दिशा कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहच देऊ शकतो.

योगीराज गंगागिरी महाराजांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून त्यांना सन्मार्गावर आणले. महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात, वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या, घुगर्‍या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त हरिनाम सप्ताहात आहे, असे महंत रामगिरी महाराज म्हणाले. गोमातेच्या गोमुत्रामध्ये सुवर्ण नितू असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध झालेले आहेत. तो मात्र, सोने धातू रूपात सापडत नाही. एक लिटर गोमुत्रात एक चतुर्थांश भाग द्रवरूपात सापडतो, दुधाचे तुप बनल्यावर तो पिवळ्या रंगाच्या रूपात काही अंशांनी असतो. अशा या गोमातेचा सांभाळ करणारे शेतकरी आता बैलजोडी विसरून ट्रॅक्टरने शेती करू लागले आहेत. भविष्यामध्ये त्याहीपेक्षा वेगळे संशोधन निघेल. परंतु आपण गोमातेचे पालन करून गोहत्या थांबविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही रामगिरी महाराज शेवटी म्हणाले.

याप्रसंगी वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे, अविनाश गलांडे, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, कृष्णा डोणगावकर, बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पोळ, दादा जगताप, सुभाष राजेभोसले, मंजाहरी गाढे, कचरू डिके, अमोल मलीक, डॉ.राजीव डोंगरे, नवनाथ महाराज म्हस्के, संतोष भागडे, भाऊसाहेब अहिरे गणेशनगर, संजय ढोकचौळे, सर्जेराव मुंढे, नितीन भागडे, सुनिल थोरात, बाळासाहेब महाराज रंजाळे, उत्तम महाराज गाढे, अमोल महाराज गाढे, रामभाऊ महाराज, व्रिकम महाराज, राजेश्वरगिरी महाराज, रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज, दादा महाराज रंजाळे, शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज, योगानंद महाराज, रघुनंदनगिरी महाराज, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदी उपस्थित होते.

लाखो भाविक घेतात आमटी भाकरीचा महाप्रसाद
वारकर्‍यांसाठी महाकुंभ समजला जाणारा योगीराज गंगागिरी महाराज यांचा 178 वा अखंड हरिनाम सप्ताह शनिदेव गाव आणि सप्तकृषीमध्ये गोदावरी तीरावर संपन्न होत आहे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथून होत असून त्या ठिकाणीही महाकुंभ होत असतो. येथील सप्ताह पाहून याच गोदामाईच्या तीरावर जागृत देवस्थान शनिदेव, प्रभू रामचंद्राचे वास्तव्य असलेले अभयारण्य आणि बाजाठाणतील आशुतोष महाराज महादेव मंदिर, स्वयंभू रामेश्वर मंदिर, कमालपूर येथे महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी, श्रीकृष्ण मंदिर, शिख बांधवांचे गुरूद्वारा, असे विविध देवदेवतांचा वास्तव्य असलेल्या भूमीत दररोज लाखो भाविक भक्त या अखंड हरिनाम सप्ताहात भेट देऊन गोदा स्नान, आमटी भाकरीचा महाप्रसाद, आणि आध्यात्मिक भजन नामस्मरण असा त्रिवेणी संगमाचा आनंद घेत आहेत आणि याची देही याची डोळा वारकर्‍यांचा कुंभमेळा गोदातीरी अनुभवत आहे.

शेकडो भाविकांचे सप्ताहात रक्तदान
शेकडो भाविक सप्ताहात रक्तदान करतात. लोकमान्य ब्लड बँक, आदर्श ब्लड बँक, नित्य सेवा ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक अशा 4 रक्तपेढी वतीने दररोज 250 ते 300 भाविकांचे रक्त संकलन केले जाते. त्याचबरोबर सप्ताह परिसरातील सर्व डॉक्टर आणि फॅमीली डॉक्टर मित्र परिवाराच्या वतीने 800 ते 1000 रुग्ण भाविकांवर विनामूल्य उपचार केले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...