प्रश्न : सद्गुरू, स्त्री-पुरुष समानता साध्य करणे शक्य आहे का? जेंव्हा दोघांमध्ये मूलभूत जन्मजात फरक असतात, तेंव्हा ही दोघं कशी समान असू शकतात?
सद्गुरू : मला वाटते की सध्याच्या संदर्भात, आपण समान या शब्दाचा चुकीचा अर्थ घेत आहोत. समान या शब्दाचा अर्थ एकसारखे असा नाही. समान म्हणजे समान संधी, समान वागणूक, समान आदर, पण कार्य-कृतीमध्ये समानता नव्हे. तुम्ही जर कार्य-कृतींमध्ये एकसारखेपणा आणलात, तर तुम्ही बाह्य जगातील बहुतेक क्षेत्रात स्त्रियांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ढकलाल. तसेच जीवनाच्या काही क्षेत्रांमध्ये पुरूषांना प्रतिकूल ढकलाल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अकार्यक्षमता निर्माण होईल – पुरुष ज्या गोष्टी चांगल्याप्रकारे करू शकतात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न स्त्रिया करू लागतील, आणि स्त्रिया ज्या गोष्टी चांगल्याप्रकारे करू शकतात त्या पुरुष करू लागतील, आणि सर्वकाही गोंधळून जाईल. प्रशिक्षणाने प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट करू शकतो. परंतु नैसर्गिक कौशल्याचा वापर केला गेला पाहिजे. एखादी गोष्ट कोणी करावी हे कोणी ठरवायचे? ही गोष्ट पुरुष करू शकतो आणि ती गोष्ट स्त्री करू शकते हे अगोदरच का ठरविले गेले पाहिजे? प्रत्येकाला हा निर्णय वैयक्तिक पातळीवर घेऊ द्या.
आज परिस्थिती बदलली आहे आणि स्त्री आणि पुरुषांमधील अनेक कामे एकसारखी बनलेली आहेत, जे पूर्वीच्याकाळी शक्य नव्हते. तंत्रज्ञानाने परिस्थिती समान केली आहे. अन्न हवं आहे म्हणजे सुपरमार्केटमध्ये जाणे. एखादी स्त्रीपुरुषापेक्षा हे अधिक चांगल्याप्रकारे करू शकते. उपजीविका करणे म्हणजे शिकारीसाठी भाला फेकणे नव्हे. तर तसे करणे म्हणजे कॉम्प्यूटरच्या कीबोर्डवर काहीतरी टाईप करणे. ती हे काम देखील अधिक चांगले करते कारण तिला प्रत्येक तासातासाने जागेवरून उठून, आळस देऊन, सिगरेट ओढून पुन्हा कामाला बसावे लागत नाही. ती जर काम करायला बसली, तर ती फक्त कामच करेल. याप्रकारची कामे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे करत आहेत. हे म्हणजे मानवी मनाची उत्क्रांती किंवा स्त्री मुक्ति किंवा पुरुषी मोठेपणा नाही. ही केवळ तंत्रज्ञानाची प्रगती आहे. आज कार्यक्षेत्रात दोघांसाठी बरीच समानता निर्माण झाली आहे.
तर समानतेचा प्रश्न कधीच नव्हता, पण एकसारखेपणाचा आग्रह धरणे हा मात्र मूर्खपणा आहे. स्त्रीला पुरुषांच्या जगात बसवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, स्त्री आणि पुरूषांना समान भूमिका असेल असा समाज आणि जग निर्माण करण्याची वेळ आता आली आहे. आपण निर्माण केलेला समाज येवढा प्रचंड पुरुषप्रधान आहे, की तो स्त्रियाच काय, पुरुषांसाठी सुद्धा चांगला नाही. सध्या तो तिच्या विरोधात अतिशय वाईट प्रकारे झुकलेला आहे आणि ती पुरुषांच्या जगात स्वतःला बसविण्याचा निकराने प्रयत्न करत आहे आणि दुर्दैवाने तिला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. आणि जेंव्हा तिला त्याचा त्रास होतो, तेंव्हा सामान्य जीवन देखील अस्तव्यस्त होऊन जाते.
आपल्याला या समाजात अनेक गोष्टींची पुनर्रचना करणे आवश्यक आहे, ज्यामुळे निसर्गाच्या पुरुष आणि स्त्रीलिंगी पैलूंसाठी समान भूमिका असेल. एक पुरुष म्हणून एका पातळीवर आक्रमकपणे काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे सौंदर्यदृष्टी, संगीत आणि कोणत्याही गोष्टीप्रती संवेदनशील असणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे बनायला हवे.