सह्याद्री… शब्द उच्चारला की, एक मोठा पट डोळ्यांसमोर उभा राहतो. पण आपल्या आत त्याचे जे चित्र असते ते ढोबळ असते. आपण सह्याद्रीला गृहीत धरल्यासारखें! आपल्या मनातले अतिशय भव्य, देखणे, पण विस्कळीत रूप. त्यामुळे आपली सह्याद्रीविषयक जाणीव आणि आस्था फार तीव्र कधीच नसते. जोपर्यंत आपण त्याचा विस्तार आणि भूवैज्ञानिक जडण-घडण समजावून घेत नाही तोवर या जाणिवा जागृत होत नाहीत. त्याचा विस्तार आणि निर्मिती प्रक्रिया समजावून घ्यायला आपण भूगोलाचे विद्यार्थी किंवा अभ्यासक असण्याचीही आवश्यकता नाही. आपल्या भोवतालाविषयी सजग असण्यासाठी, ते माहीत असायला हवें इतकेच! त्यासाठी सह्याद्रीचा विस्तार आणि निर्मिती प्रक्रिया, सामान्य माणसाच्या नजरेतून बघण्याचा हा प्रयत्न! या प्रयत्नातून आपल्या आतले ‘सह्याद्री चित्र’ स्पष्ट होईल आणि आपल्या सह्याद्रीविषयक जाणिवा आणि संवेदना वाढतील.
सहलीला एखाद्या डोंगरावर किंवा पठारावर गेलो तर आपण सह्याद्री किंवा पश्चिम घाटात आहोत, हे अबोध पातळीवर असलेले भौगोलिक संंचित जाणिवेच्या पातळीवर येईल. त्यातून काही संवेदना आपसूक जाग्या होतील.दख्खनचे पठार ज्या सीमांनी निश्चित होते, त्याची पश्चिम सीमा म्हणजे सह्याद्री. उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य रांगांनी नियंत्रित झालेला पठाराचा विस्तार, दक्षिणेकडे पश्चिम आणि पूर्व घाटाने बांधला आहे. सह्याद्रीचा तीव्र पश्चिम उतार आणि उपरांगांनी पूर्र्वेेकडच्या पठाराची केलेली विभागणी, यामुळे लांंब पल्ल्याच्या नद्यांची प्रणाली तयार झाली आहे. पश्चिम घाटातून उगम पावणार्या या नद्या पूर्व घाटाला भेदत बंंगालच्या उपसागराला मिळतात.
याउलट पश्चिमेकडील तीव्र उतार आणि समुद्र यादरम्यानचे अंतर कमी आहे. परिणामी, वेगाने वाहणार्या, पण कमी विस्ताराच्या नद्यांची प्रणाली सह्याद्रीच्या पश्चिमेला निर्माण झाली आहे. सह्याद्रीचा विस्तार पश्चिम किनार्यालगत 1600 कि. मी. लांंबीचा आहे. साधारण 1 लाख 60 हजार वर्ग कि. मी.चा हा परिसर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यांत विस्तारला आहे. पश्चिम किनार्यालगतची अखंड पर्वतरांग, तापी नदीपासून दक्षिणेकडे स्वामीथोपपर्यंत जवळपास सलग आहे. संपूर्ण रांगेची सरासरी उंची 1200 मीटर्स आहे. तीन ठिकाणी ही रांग काहीशी विभाजित झालेली दिसते. गोवा, पालघाट आणि शेनकोट्टा ही ती तीन ठिकाणे. पैकी पालघाट हे सर्वात जुने आणि मोठे विभाजन आहे. यामुळे सह्याद्रीचे उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग मानले जातात. पैकी शेवटच्या विभागात पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकमेकांना मिळतात. निलगिरीजवळ हे दोन्ही घाट एकमेकांना भिडतात आणि पुढे दक्षिणेकडे हा विस्तार अधिकच निमुळता होतो. पश्चिम घाटाच्या निर्मितीचा विचार करताना संपूर्ण द्विपकल्पाच्या निर्मितीचा विचार करावा लागतो. भूखंडवहनाच्या सिद्धांताप्रमाणे हा द्विपकल्प गोंडवनाचा भाग आहे.
अडीचशे दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीचे विभाजन एक महाखंड (पॅनिया) आणि एक महासागर (पॅन्जिया ) असे होते. अल्फ्रेड वेगनर यांच्या उपपत्तीनुसार, आधी महाखंडाचे विभाजन लॉरशिया आणि गोंडवना अशा दोन भूभागांत झाले. पैकी गोंडवना भूभागाच्या विभाजनातून आताच्या दख्खन पठाराची निर्मिती झाली असावी. गोंडवनाच्या विभाजनाला ज्युरासिक कालखंडाच्या शेवटी सुरुवात झाली असेल आणि साधारणपणे क्रिटेशियस कालखंडाच्या पूर्वार्धात ही प्रक्रिया पूर्ण झाली असेल. तसेच क्रिटेशियस काळातच भारतीय भूभाग आफ्रिका खंडापासून विभक्त झाला असेल. यादरम्यानच्या भूवैज्ञानिक उलथापालथीकडे बघूया.साधारण 180 दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवनाच्या एका खंंडामध्ये विभाग निर्माण झाला.
या विभागाने भारत आणि मादागास्कर वेगळे झाले. पैकी भारतीय भूखंडाची पश्चिम बाजू उंच कड्यासारखी होती. हा विभक्त झालेला भारतीय भूखंड युरेशियन भूखंडाकडे (प्लेटकडे) जात असताना पुनर्बांधणी झाली. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर लाव्हारस बाहेर पडला. यातूनच सध्याच्या दख्खन पठाराच्या उत्तर भागाची निर्मिती झाली. यामुळेच तापी आणि गोव्यादरम्यानचा भूभाग मुख्यत्वे बेसाल्ट खडकाचा बनला आहे. उलटपक्षी कर्नाटकपासून दक्षिणेकडचा भाग ग्रेनाईट स्वरुपाचा राहिला. उत्तर सह्याद्री भागाची रचना लाव्हारस थंड होण्याच्या प्रक्रियेत झाली. या प्रक्रियेत क्रमाक्रमाने थंड होत जाणारे लाव्हारसाचे भाग पायर्यांसारखे घट्ट होत गेले. ट्रॅप्स म्हणजे स्वीडीश भाषेत पायर्या. म्हणून या भागाला “deccan tA°aps” म्हटले गेले.
आपण उत्तर सह्याद्रीची प्रामुख्याने चर्चा करू. कारण महाराष्ट्राचा भूभाग हा उत्तर सह्याद्रीचा भाग आहे. पश्चिमेकडे तीव्र उतार आणि पूर्वेकडे सपाटी अशी साधारण रचना झालेली आहे. मुख्य रांगेत महाराष्ट्रात चार उंच शिखरे येतात. कळसूबाई (1646 मी.) हे उत्तर सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर, त्याखालोखाल साल्हेर (1567 मी.), महाबळेश्वर (1438 मी.) आणि हरिश्चंंद्रगड (9424 मी.) ही महत्त्वाची शिखरे आहेत. उत्तर सह्याद्रीचा पूर्व विस्तार तीन उपरांगांनी विभाजित झाला आहे.
1) अजिंठा-सातमाळा रांंगेने तापी आणि गोदावरीचे खोरे वेगळे होते. ही रांग नाशिक जिल्ह्यातील नांंदगावपासून सुरू होते आणि बुलढाणा जिल्ह्यापर्यंत तिचा विस्तार होतो. नाशिकला या रांंगेने गळ्यातील माळेसारखे कोंदण दिलेय, म्हणून तिचे इथले नाव सातमाळा! या रांगेला पुढे अजिंठा डोंगररांंग म्हणतात. ही संपूर्ण रांंग बेसाल्ट लाव्हा ट्रॅपने बनलेली आहे. याच खडक प्रकारात अजिंठा लेण्यांची निर्मिती झाली आहे.
2) हरिश्चंद्र – बालाघाट रांग : या रांंगेने गोदावरी आणि भीमा नदीचे खोरे स्वतंंत्र केले आहे. नगर, बीड, सोलापूर, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांंमध्ये झालेला या रांंगेचा विस्तार तुलनेने कमी उताराचा आहे. मुख्यत्वे बेसाल्ट लाव्हाने तयार झालेला हा भाग उष्ण कटीबंंधीय, शुष्क, खुरटी वने आणि गवताळ प्रदेशाचा आहे. त्यानुसार या पट्ट्यातील वन्यजीवन आढळून येते.
3) महादेव डोंगररांग सातारा जिल्ह्यातून सुरू होते. या रांंगेने कृष्णेचे खोरे वेगळे केले आहे. गाळाचे खडक आणि लॅटराईट या पठाराचा खडक प्रकार आहे. त्यानुसार मोठे वृक्ष आणि पानगळीची वने निर्माण झाली आहेत. महाबळेश्वर हे या रांगेतील उंच आणि थंड हवेचे ठिकाण, महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे.
या तीन डोंगररांगांच्या दरम्यान साधारणपणे लाव्हा उद्रेकाच्या दरम्यान तयार झालेला बेसाल्ट खडक आहे. इथे आढळणारी काळी मृदा मध्य सह्याद्रीतील रेगूर मृदेपेक्षा वेगळी आहे. शिवाय कमी उतार आणि बेसाल्ट खडक असल्यामुळे नद्यांच्या मार्गात स्तंभीय खनन कमी होते. म्हणून या नदी प्रणालीत गाळाचे वहनही कमी होते.
मध्य सह्याद्री मुख्यत्वे ग्रेनाईट आणि पट्टीताश्म प्रकारच्या खडकाने बनला आहे. प्रीकॅम्ब्रियन काळातील ज्वालामुखी उद्रेकाने हा भूभाग तयार झाला आहे. युरेशियन भूखंंडाकडे जात असताना झालेल्या पुनर्बांधणीत हा भाग उत्तर सह्याद्रीच्या तुलनेने कमी बाधित झाला. मुख्यत्वे कर्नाटक पठाराच्या या भागात बाबाबुदान ही सह्याद्रीची उपरांंग आहे. ही उपरांंग लोह खनिजाच्या दृष्टीने समृद्ध आहे. कर्नाटकच्या उपपठाराचा भाग म्हणजे म्हैसूर पठार. हे पठार बाबाबुदान पर्वतरांगांचाच भाग आहे. यातील कोलार प्रदेशात सोने सापडते. याशिवाय मँगनीज, क्रोमियम, बॉक्साईट आणि तांबे ही महत्त्वाची खनिजे या प्रदेशात आढळतात. पट्टीताश्म हा रूपांतरीत खडक प्रकार आहे. हा क्वार्टझ आणि फेल्सपारचा महत्त्वाचा स्रोत आहे.
कुद्रेमुख (1892 मी.) पुष्पगिरी (4714 मी.) आणि वावूलमाला (2339 मी.) ही मध्य सह्याद्रीतील उंंच शिखरे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मध्य सह्याद्रीच्या दक्षिण टोकाला एकत्र येतात. ही पर्वतरांग निलगिरी पर्वतरांग म्हणून ओळखली जाते. या रांंगेतच पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकमेकांना भिडतात. पुन्हा दक्षिणेकडे पश्चिम घाट स्वतंत्रपणे पुढे जातो.
पालघाटने मध्य आणि दक्षिण सह्याद्रीची विभागणी झाली आहे. दक्षिण सह्याद्रीतील अनामलई, पलानी, कार्डमम (येलामाला) आणि अगस्त्यमलाई या महत्त्वाच्या पर्वतरांगा आहेत. सह्याद्री दक्षिणेकडे उंच होत जातो. अनामलाई पर्वतरांंगेतील अनैमुडी (2695 मी.) हे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर. शेनकोट्टाने अगस्त्यमलाई पर्वतरांगेला इतर तीन रांगांपासून वेगळे केले आहे. अगस्त्यमलाई हे सह्याद्रीचे शेवटचे दक्षिण टोक.
उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वतरांग उंंच होत जाते. उत्तर सह्याद्रीचा पूर्व भाग पसरट तर दक्षिणेला तो निमूळता होत जातो. सह्याद्रीच्या उंंचीमुळे मान्सून वारे अडतात. म्हणून संपूर्ण पश्चिम म्हणजेच किनारपट्टीचा प्रदेश हा अतिपावसाचा आहे. तुलनेने पठारावर पावसाचे प्रमाण कमी होत जाते. शिवाय उंंच शिखरांमुळे वार्यांच्या गतीत होणार्या परिवर्तनाने सह्याद्रीच्या पूर्व भागात काही ठिकाणी पर्जन्यछायेचे प्रदेश निर्माण झाले आहेत. म्हणूनच दक्षिण पश्चिम घाटाच्या आणि उत्तर पश्चिम घाटाच्या वनप्रकारात फरक होत जातो. दख्खन पठाराची नैसर्गिक विभागणीदेखील हवामान आणि पर्यायाने वनांच्या वेगळेपणाला कारणीभूत झाली आहे. या वेगळेपणाने प्रदेशागणिक असंख्य वनस्पती प्रकार अस्तित्वात आले. वनस्पती प्रकार आणि वनांच्या प्रकारानुसार प्राणी जीवनही वैविध्यपूर्ण झाले आहे. ही जैवविविधता पृथ्वीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. म्हणून जगातल्या 10 जैवविविधता संवदेनशील क्षेत्रात याचा समावेश होतो.
ही सह्याद्रीची वैशिष्ट्यपूर्ण भूपृष्ठनिर्मिती सहेतूक असेल की निर्हेतूक हे सांंगणे अशक्य आहे. भूगर्भीय हालचाली आणि त्यानुसार होत गेलेल्या भूपृष्ठीय पुनर्रचना, हवामान विविधतेला आणि पर्यायाने जैवविविधतेला पोषक ठरल्या. या हालचालींचा आणि पुनर्रचनांचा आपण आढावा घेतला. अगदी अचूक नसेल, पण ढोबळ कालखंड आपल्याला नक्की करता येतो. एवढ्या मोठ्या भूवैज्ञानिक इतिहासाकडे आपण चमत्कार म्हणून बघू शकतो. एखादे महाकाव्य म्हणून बघू शकतो किंवा निव्वळ उपभोगवादी दृष्टिकोनातूनही बघू शकतो. लाखो वर्षे संथगतीने चाललेल्या या प्रक्रियेला उपभोगवादी दृष्टिकोन वजा करून प्रचंड गतिमान करू शकतो. अभावितपणे दिलेली ही मानवी गती आपल्याच नाशाला कारणीभूत ठरू शकते. तरीही आपण सह्याद्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नसू तर ‘नतद्रष्ट’ याशिवाय दुसरी संज्ञा आपल्यासाठी नाही.
देवेन कापडणीस, अभ्यासक, लेखक व चित्रपट निर्माता-दिग्दर्शक