Saturday, May 4, 2024
Homeनगरसाईबाबांच्या दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी

साईबाबांच्या दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पूर्वीपासून प्रथा परंपरेनुसार चालत आलेली साईबाबांची काकड आरती, दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी यामध्ये कोणताही बदल करू नये तसेच उत्सव काळात 24 तास दर्शन सुरू ठेवल्याने साईबाबांना आराम मिळत नसल्याने शिर्डी ग्रामस्थांसह जगभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या असून याविषयावर तातडीने कारवाई करून साई संस्थानला योग्य ते निर्देश करावेत, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

शिर्डी ग्रामस्थांनी आ. काळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण साईबाबा संस्थानचा पदभार स्विकारून काही आठवडे लोटले आहेत. पूर्वीच्या विश्वस्त मंडळाने भक्तांचा गर्दीच्या व उत्सवाच्या सोयीनुसार साईबाबांच्या दर्शन व आरतीच्या वेळेत वेळोवेळी बदल केला. दर्शनाच्या बाबतीत देखील असेच बदल करत वेळप्रसंगी 24 तास दर्शन सुरू ठेवले. मुळात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जसे की साईबाबांना त्यांच्या पहाटेच्या नियमित मंगल वेळेत भूपाळी ललकारीने निज अवस्थेतून काकड आरतीने जागे करणे, दिवसभरातील दर्शन व आरत्यांच्या विधीनंतर रात्री होणारी शेजारती. हा वर्षानुवर्ष चालत आलेला नियम पूर्वीच्या विश्वस्त मंडळाने बदलला व दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल केला.

पूर्वीच्या काळी होणार्‍या काकड आरती, शेजारती व दर्शनाची वेळ कायम करावी त्यात कुठलाही बदल करू नये. साईबाबांचे समाधी दर्शन 24 तास कदापीही सुरू ठेवू नये, 24 तास दर्शन सुरू ठेवल्याने आपण एकप्रकारे साईबाबांना झोपेसाठी, आरामासाठी वेळ देत नाही असाच त्याचा अर्थ निघतो आणि याच प्रकारामुळे समस्त जगभरातील साईभक्तांच्या तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

निवेदनावर कैलास कोते, अभय शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, कमलाकर कोते, बाबासाहेब कोते, रवींद्र गोंदकर, मंगेश त्रिभुवन, अशोक गायके, निलेश कोते, प्रमोद गोंदकर, दत्तात्रय कोते, रमेश गोंदकर, सुजित गोंदकर, अ‍ॅड. अनिल शेजवळ, संदीप पारख, अविनाश गोंदकर, पंडित गुडे, देविदास बोठे, रवींद्र सोनवणे, नितीन धिवर यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाची प्रत साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या