Wednesday, September 18, 2024
Homeनगरकार्यकारी अधिकारी निवासस्थान परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

कार्यकारी अधिकारी निवासस्थान परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

24 तास सुरक्षारक्षक तरी चोरी || साईसंस्थान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस बगीचामधील चंदनाची झाडे रविवारी रात्री चोरट्यांनी कापून नेली. 24 तास या परिसरात सुरक्षा रक्षक तैनात असताना झाडांची चोरी झाल्याने संस्थान अधिकार्‍यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची निवासस्थाने 500 रूम भक्त निवास परिसरातील बगीचा विभागाच्या जवळ असून निवासस्थान परिसर सुंदर वनराईने नटला आहे. विविध झाडे याठिकाणी असून बर्‍याच वर्षांपासून चंदनाची झाडे देखील आहेत. हा परिसर अत्यंत सुरक्षित असून या परिसरात साईबाबा संस्थान कर्मचारी वगळता शक्यतो बाहेरील व्यक्तींना याठिकाणी परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षारक्षक 24 तास तैनात असतात. रविवारी रात्री अधिकार्‍यांच्या निवासस्थानाच्या पाठीमागील बाजूस बगीचामधील चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेली.

निवासस्थानाजवळ जाण्यासाठी एकच मार्ग असून तेथे नेहमी सुरक्षा रक्षक तैनात असतात. निवासस्थानाच्या मागील बाजूस चार चंदनाची मोठी झाडे असून त्या झाडांवर तस्करांची वक्रदृष्टी पडली व चोरट्यांनी गनिमी कावा करत पाठीमागील बाजूस असलेले तार कंपाऊंडच्या तारा दोन ठिकाणी कापून चोरवाट तयार करत बगीचा परिसरात प्रवेश केला.रविवारी रात्री 2 चंदनाची झाडे कापून झाल्यानंतर तिसरे झाड कापताना कोणाची तरी चाहूल लागल्याने चोरटे पसार झाले. थेट मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या घराजवळ चोरी करण्याचे धाडस करणारे चोरटे कोण याबाबत सोमवारी संस्थान कर्मचार्‍यांमध्ये चर्चा सुरू होती. मागील बाजूस चंदनाची झाडे आहेत हे फक्त अधिकार्‍यांना, बगीचा विभागाला आणि संस्थान कर्मचार्‍यांनाच माहिती असावे मग या परिस्थितीत चंदनतस्करांना याची माहिती मिळाली कशी? चंदन चोरटे मागील बाजूने तारा कापत असताना त्यांना कोणी पाहिले नाही का? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या