शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
महाराष्ट्रावर आलेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 कोटी रुपयांची मोठी मदत जाहीर केली आहे. यापूर्वी संस्थानने 1 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र संकटाची भीषणता लक्षात घेऊन मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
अहिल्यानगरच्या जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी हा निर्णय घेतला. वाढीव मदतीसाठी उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी आज मंगळवारी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
संस्थानने केवळ राज्यालाच मदत केली नाही, तर स्थानिक पातळीवरही माणुसकी जपली आहे. शिर्डी परिसरात मुसळधार पावसामुळे ज्या कुटुंबांची घरे पाण्याखाली गेली, त्यांच्यासाठी साई आश्रम येथे तात्पुरत्या निवार्याची आणि प्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.




