शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थान परिसरात स्वतःला तथाकथित पीए म्हणून मिरवणार्या दलालांच्या टोळ्यांचा धुमाकूळ वाढला असून, झटपट दर्शनाच्या नावाखाली भाविकांची खुलेआम फसवणूक सुरू आहे. त्यामुळे या व्हॉईटकॉलर पीएना साईमंदीर परिसरात तात्काळ बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
प्रशासकीय तदर्थ समिती कार्यरत असतानाही काही विशेष पीए साईमंदीर परिसरात मोकळेपणाने वावरताना दिसत आहेत. हे लोक स्वतःला मोठ्या नेत्यांचे वरिष्ठांचे खाजगी सहाय्यक असल्याचे भासवतात. संस्थानातील काही अधिकारी आणि पीआरओ विभागातील कर्मचार्यांवर दबाव आणून, ते व्हीआयपी पास मिळवतात आणि त्याचा वापर करून भाविकांना दर्शन झटपट पैसे या तत्वावर दर्शनाची सौदेबाजी करतात.यापैकी अनेक जण शिर्डीमध्ये येणार्या राजकीय नेत्यांभोवती घुटमळत असतात. सेलिब्रेटी किंवा मान्यवर पाहुणे शिर्डीत दाखल झाले की, हेच पीए त्यांच्याशी जवळीक असल्याचे नाटक करत प्रतिष्ठा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
त्यामुळे भाविकांची फसवणूक तर होतेच, पण साईमंदिराची शिस्तही धुळीस जात आहे. साईबाबा संस्थानच्या प्रतिष्ठेला गालबोट लावणार्या अशा प्रवृत्तींवर तात्काळ अंकुश घालावा, या दलाल पीए टोळ्यांना नो-एंट्री आदेश द्यावा आणि त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून वैभवशाली संपत्तीची चौकशी केली जावी, अशी मागणी आता उफाळून आली आहे. अन्यथा संस्थान प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र निर्माण होईल, असा इशारा स्थानिकांनी व साईभक्तांनी दिला आहे.