Friday, May 3, 2024
Homeनगरसाई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करणार - काळे

साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांविरुध्द गुन्हा दाखल करणार – काळे

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

एक्सपायर झालेले शुद्ध गायीचे तूप अखाद्य कारणाकरिता विक्री करण्यासाठी टेंडर काढल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली असल्याचे सांगून दिशाभूल केली असल्याची माहिती अधिकारात उघड झाले असून याविषयी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

- Advertisement -

श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या संस्थानचे एक्सपायर झालेले शुद्ध गायीचे तूप 214 क्विंटल टेंडर काढून विक्रीला काढले होते. हे टेंडर प्राप्त झाल्यानंतर मी त्याच्यावरती आक्षेप घेतला आहे. एक्सपायर झालेले तूप कुठल्याही प्रकारे विकता येत नाही. ही निविदा बेकायदेशीर असल्याचा मी आरोप केला. त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी साईबाबा संस्थान यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी ते हे तूप अखाद्य कारणासाठी वापरत आहे आणि त्याला अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. ही त्यांनी दिशाभूल केली आहे.

त्या अनुषंगाने मी माहिती अधिकारात अन्न व औषध प्रशासनाला माहिती विचारली की, एखादे खाद्यपदार्थ एक्सपायर झाले तर ते बाजारामध्ये विकण्याची नियमावली आणि अखाद्य पदार्थ बाजारात विकण्यासाठी तसेच नष्ट करण्यासाठी असलेली नियमावली देण्यात यावी, अशी माहिती मागीतली होती.त्याअनुषंगाने मला माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार एखादे खाद्यपदार्थ एक्सपायर झाल्यानंतर विकण्यासाठी कुठल्याही प्रकारची नियमावली उपलब्ध नाही आणि एक्सपायर माल विकणे हा गुन्हा ठरतो. तो नष्टच करावा लागतो. त्याचबरोबर अखाद्य कारणासाठी कुठल्याही प्रकारची नियमावली नाही.

याचाच अर्थ असा की, एखादे खाद्यपदार्थ एक्सपायर झाले तर ते नष्ट करावे लागते. कुठल्याही प्रकारे अखाद्य म्हणून वापरण्यासाठी परवानगी नाही. परंतु साईबाबा संस्थानचे आयएएस असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी हे तूप बाजारामध्ये निविदा काढून विकण्याचा जो घाट घातला होता तसेच याअगोदर देखील काही प्रमाणात तूप विकलेले असल्याची माहिती मिळाली आहे, असेही श्री. काळे यांनी सांगितले.

जर त्यांनी अशा प्रकारे तूप विकले असेल त्याचप्रमाणे निविदा काढलेली आहे. हा दखलपात्र गुन्हा आहे. सदरचा दखलपात्र गुन्हा कुठल्याही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या नागरिकाने पोलीस ठाण्यात एफआयआर द्यावी यासाठी कायद्यात तरतूद आहे. त्याअनुषंगाने मी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या