ग्रामसभा : वाहतूक पोलिसांची वागणूक व पॉलिशवाल्यांकडून होणार्या घटनांविरोधात संताप
शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी शहरातील साईभक्तांची वाहतूक शाखेकडून होणारी पिळवणूक तसेच पॉलिशीवाल्यांकडून होणारी फसवणूक त्याचबरोबर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ आदी विषयांवर शुक्रवारी सायंकाळी शिर्डीत सर्वपक्षीय ग्रामसभेत एकमताने सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आल्याचे ग्रामसभेचे अध्यक्ष हिरामण वारुळे यांनी जाहीर केले.
शुक्रवारी सायंकाळी द्वारकामाई समोर सर्वपक्षीय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी हिरामण वारुळे यांची निवड करण्यात आली. यास अनुमोदन रवींद्र गोंदकर यांनी दिले. यावेळी ग्रामसभेसाठी शहरातील सर्व समाजाचे बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविकात प्रमोद गोंदकर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त असलेले शिर्डी शहराची बदनामी होत आहे. ती थांबविण्यासाठी या सर्वपक्षीय ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरात साईभक्तांची चोरी, लूटमार याबाबत पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ, भाविकांची फसवणूक, अवैध धंदे, शालेय विद्यार्थिनींची छेडछाड, मिसिंग व्यक्तीबाबत खुलासा, शहर वाहतूक शाखेकडून भक्तांची होणारी पिळवणूक आदी विषयामुळे शहर बदनाम होत असून या गोष्टीला वेळीच आळा घातला पाहिजे. यासाठी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन म्हणाले की, शहरातील महिला भाविकांच्या चैन सणाचींग तसेच वाहतूक शाखेबाबत होणारी भाविकांची अडवणूक हे विषय महत्त्वाचे असून मुंबई मायानगरीप्रमाणे शिर्डी रोजगार नगरी झाली असून याबरोबरच गावाला शिस्त लागायला हवी होती. मात्र ती लागली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
माजी उपनगराध्यक्ष नीलेश कोते म्हणाले की, ग्रामसभेत काही लोकांना जातिवाद दिसला, राजकीय हेतू दिसला, आम्ही गावाचे उक्ते घेतले आहे का? आम्हीच अंगावर गुन्हे घ्यायचे का? शिर्डी सर्वांची आहे, सर्व गावाने अपप्रवृत्तीविरूद्ध लढा देणे गरजेचे आहे.
नगराध्यक्षा अर्चनाताई कोते म्हणाल्या की, भाविक शिर्डीत प्रवेश करताच त्यांना चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणे, लूटमार सुरू होते. हे कुठेतरी थांबले पाहिजे. साईभक्तांना पोलिसांकडून होणार्या त्रासातून वाचविण्यासाठी जो निर्णय होईल त्याच्या अंमलबजावणीत सगळ्यांच्या पुढे असेल.
वैशाली गोंदकर म्हणाल्या, महिला सुरक्षित नाही. शहरात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात यावे. यासाठी साईबाबा संस्थानला विनंती केल्यास आपली मागणी मान्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात रिक्षांचे माफक दर आकारण्यात यावे. ग्रामसभा भरवली ही आनंदाची बाब आहे. येथे होणारे निर्णय अंमलातही आणावे, असाही टोला त्यांनी लगावला.
अनिता जगताप म्हणाल्या की, शहरात मुलींचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी सर्व पालकांनी जागृत झाले पाहिजे. जमादार इनामदार म्हणाले की, ग्रामस्थांनी आता हातात दांडके घेण्याची वेळ आली असून पोलीस व्यवस्था नसल्यात जमा आहे.
ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके यांनी सांगितले की, बाजारतळ येथे पोलीस चौकीचा विषय मार्गी लागला आहे. शहरातील तरुणांनी याकामी पुढाकार घ्यावा. आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. साईभक्तांची लूटमार थांबली पाहिजे. शिर्डीत बाहेरच्या लोकांना व्यवसाय करण्यास विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक शिवाजी गोंदकर म्हणाले की, शिर्डीची सुरक्षा ही साईभक्तांची सुरक्षा, असे सांगून शाळेतील मुला-मुलींना संरक्षण द्यावे लागते ही बाब निंदनीय आहे. साईबाबा संस्थांनने मुलींसाठी बससेवा सुरू केली तर योग्य होईल. पूर्वी शिर्डी ग्रामस्थ व पोलिसांत समन्वय चांगला होता. पोलिसांकडून त्रास असतानाही साईभक्त शिर्डीला येतात, ही बाब कौतुकास्पद आहे.
विजय कोते यांनी सांगितले की, साईबाबांच्या पावनभूमीत आपल्याही काही जबाबदार्या आहे. आपल्या माता-भगिनी तसेच येणार्या पिढीसाठी आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. शिर्डीत साईभक्त साईदर्शनाला आल्यानंतर तो या ठिकाणी जे पैसे खर्च करतो, त्यावर आपल्या सर्वांची रोजीरोटी चालते, हे प्रामुख्याने सर्वांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
कमलाकर कोते म्हणाले की, साईभक्तांची लूट केली तर इथेच फेडावे लागेल. साईबाबा जागृत देवस्थान आहे. आमची मागणी बेशिस्त वागणार्यांच्या विरोधात आहे. साईभक्तांवर दरोडे टाकणारे वाहतूक पोलीस खरे गुन्हेगार आहेत. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी श्री. घुमरे यांना निलंबित केले पाहिजे.
तसेच वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक गोकावे यांची तातडीने बदली व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश आरणे, दत्तात्रय कोते, रवींद्र गोंदकर, अनुप गोंदकर, दीपक वारुळे, वैभव कोते, सचिन चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले.
कैलास बापू कोते म्हणाले, आजच्या परिस्थितीला आपण सर्व जबाबदार असून साईसेवक आपल्या वागणुकीमुळे बदनाम झाला आहे. व्यवसाय करताना शिस्त पाहिजे. महिलांची छेडछाड, भक्तांची लूटमार थांबली पाहिजे. गावात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. गावाच्या भल्यासाठी आम्ही अंगावर आणखी केसेस घेण्यासाठी तयार आहोत. शिर्डीची भाईगिरी मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे म्हणाले, मिसिंग काय असते, याबाबत अनेकांना माहित नाही. घरगुती कारणामुळे व्यक्ती घर सोडून जातात. शिर्डीत दोन वर्षांत भाविकांच्या मिसिंगची संख्या फक्त 18 आहे. यामध्ये काही भाविक परराज्यातील असल्याने भाषेच्या कारणास्तव संपर्क होत नाही. तसेच त्यांच्या व्यक्ती घरी पोहोचल्या असल्या तरी आम्हाला याबाबत संपर्क साधत नसल्याचे सांगत आमच्यासाठी एक एक व्यक्ती महत्त्वाचा आहे.
त्यामुळे आम्ही प्रत्येक व्यक्तीचा शोध घेत आहोत. यापुढे शिर्डी शहरातील अवैध धंदे दारू, मटका याठिकाणी छापा टाकण्यासाठी पंच म्हणून प्रत्येक वॉर्डातील दोन-दोन नगरसेवकांनी माझ्याबरोबर यावे, असे आव्हान केले. यापुढे पोलीस सोबत असल्याचे सांगत ग्रामस्थ म्हणून मला साथ द्या, असे आवाहन केले.