अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
झोपडी कॅन्टीन परिसरातील दूधसंघाच्या जागेवर उभी राहिलेली साईमिडासची ही इमारत अडचणीच्या भोवर्यात सापडली. या इमारतीचे बांधकाम बंद करण्याचे आदेश राज्य प्रर्दूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. बांधकामची परवानगी न घेतल्याने इमारतीचे काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. या इमारतीबाबत दीप चव्हाण आणि संजय घुले यांनी अॅड. अभिजीत पूप्पाल यांच्यामार्फत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली होती.
दोन लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त बांधकाम असेल तर हरित आयोग, प्रर्दूषण नियंत्रण मंडळ परवानगी घ्यावी लागते. ती घेतली गेली नसल्याची तक्रार चव्हाण व घुल यांनी केली होती. त्याची दखल घेऊन प्रर्दूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते. त्यांना बांधकाम त्रुटी आढळून आल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश प्रर्दुषण मंडळाने मनपा आयुक्ता यांना दिले असून दोन लाख स्क्वेअर फुटांपेक्षा जास्त जर बांधकाम औद्योगिक, व्यावसायिक किंवा घरगुती प्रकारात जर करायचे असेल तर स्क्वेअर फुटात राहण्यास जाणार्या लोकांकडून ते वापरत असलेले पाणी, हवा आणि अन्न, यातून जो मैला तयार होणार आहे, त्यानूसार बांधकाम व्यावसायिकाने संबंधीत इमारतीत विशिष्ट तरतुदी करून मैला, कचरा विल्हेवाट लावण्याआधी त्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आवश्यक आहे.
पण याठिकाणी प्रर्दुषण मंडळाच्या अधिकार्यांना तसे काहीच आढळले नाही. ही इमारत जर पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर त्याचा शहराच्या प्रदूषणावर परिणाम होण्याची शक्यता होती. यामुळे हे बांधकाम थांबवण्यात आले आहे. आधीच ही इमारत आणि बांधकाम वादाच्या भोवर्या सापडलेले आहे. आता प्रर्दुषण मंडळाच्या कारवाईमुळे बांधकाम माफीयात खळबळ उडाली आहे.