Sunday, May 19, 2024
Homeनगरनूतन कार्यकारी अधिकार्‍यांच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे कर्मचार्‍यांनी घेतली धास्ती

नूतन कार्यकारी अधिकार्‍यांच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे कर्मचार्‍यांनी घेतली धास्ती

शिर्डी | Shirdi

साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवा शंकर यांच्या शिस्तबद्ध व अनोख्या कार्यपद्धतीमुळे साई संस्थान कर्मचार्‍यांमध्ये कामात नम्रता व चपळाई दिसून येत असून आपल्या पदाचा कुठल्याही प्रकारचा बडेजाव न करता सर्वसामान्य साईभक्ताप्रमाणे अचानकपणे कुठल्याही विभागात जाऊन तेथील कामाची पाहणी करण्याचा त्यांनी धडाका लावल्याने कामचुकार कर्मचार्‍यांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली आहे.

- Advertisement -

श्री साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद काही महिन्यांपासून रिक्त होते नुकतेच चार दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी पी. सिवा शंकर यांची नियुक्ती झाली. पद्भार घेताच त्यांनी कुणालाही न सांगता तीन तास दर्शन रांगेत उभे राहून सर्वसामान्य साईभक्ताप्रमाणे दर्शन घेतले. संस्थान कर्मचार्‍यांची वागणूक व साईभक्तांना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या या कार्यपद्धतीची चर्चा राज्यासह देशात चर्चेचा विषय ठरली.

एरवी या पदाचा पदभार घेण्यासाठी अनेक अधिकार्‍यांचे स्वागत करण्यासाठी साई संस्थांची मोठी फौज तैनात असते. मोठा गाजावाजा, पोलीस, कर्मचारी अधिकार्‍यांचा ताफा आणि फुलांचे गुच्छ, शाल, हार, तुरे असा सोहळा दिसून येतो. मात्र या नवनियुक्त अधिकार्‍याने पहिल्याच दिवशी दाखवून देत मुझे ना किसीने भेजा हैं ना मैं यहा आया हूँ… मुझे तो साईबाबा ने बुलाया है… या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डायलॉगची आठवण करून देत आपली वेगळी छाप निर्माण केली.

सर्वसामान्य भाविकाप्रमाणे दर्शन घेताना काही दलालांनी त्यांना तात्काळ दर्शन देतो म्हणून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु फसवणूक झाली म्हणून ओरड न करता त्या सामान्य साईभक्तांना अतिशय उत्तम असा संदेश सुद्धा आपल्या वागणुकीतून अप्रत्यक्षरित्या दिला. कोणी कितीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी आपली सद्बुद्धी वापरत आपणच सतर्क रहावे व साईबाबा संस्थानच्या अधिकृत लॉकरमध्ये आपले सामान सुरक्षित ठेवावे. जेणेकरून फसवणूक होणार नाही.

शनिवारी संस्थान कर्मचार्‍यांमध्ये सकाळी सकाळी बातमी पसरली की नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी हे द्वारकामाई व चावडी इथे येणार आहे. त्यामुळे एरवी निवांत असणारे सुरक्षा रक्षक व संस्थान कर्मचारी सतर्क झाले. सर्वत्र वातावरण अचानक बदलल्याचे दिसून आले. एकही फोटो एडिटिंग वाला, पिशव्या विकणार्‍या मावशी, गंध लावणारी चिल्लर पार्टी अन् पॉलिशवाले दिसणार नाही याची तंतोतंत काळजी घेत परिसर स्वच्छ करत आपल्या आपल्या कर्तव्याच्या जागेवर प्रत्येकाने ताबा घेतला. कार्यकारी अधिकारी येण्याची वाट कर्मचार्‍यांकडून बघितली जात होती. परंतु अनेक तास होऊन देखील नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तिथे आलेच नाहीत. मग साहेब गेले कुठे अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली.

परंतु पी. सिवा शंकर यांनी कुणालाही काही न सांगता आपला मोर्चा साई प्रसादालयाकडे वळविला. येथे सुद्धा त्यांनी प्रसादालय प्रमुख विष्णूपंत थोरात यांना न कळविता अचानक एंट्री मारली. मात्र या ठिकाणी असलेल्या काही कर्मचार्‍यांच्या ते लक्षात येताच त्यांनी तात्काळ मोबाईलद्वारे कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी प्रसादालयाच्या सर्व कामकाजाची माहिती घेतल्यानंतर तेथील विभाग प्रमुखांनी त्यांना व्हीआयपी विभागात प्रसाद घेण्याचा आग्रह केला. मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपल्या साधेपणाचा प्रत्यय देत सामान्य भाविकांमध्ये बसत साई प्रसाद घेतला.

पी सिवा शंकर यांच्या या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे कर्मचार्‍यांना कोणतीही कारवाई न करता आपोआप शिस्त लागत असेल तर नक्कीच मोठा बदल येत्या काळात बघावयास मिळेल, अशी खात्री शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांना वाटू लागली आहे. असे असले तरी पी. सिवा शंकर यांच्यासमोर प्रलंबित विकास कामांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे. यात प्रामुख्याने साई संस्थानचा लेझर शो गार्डन प्रकल्प, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर व रुग्णांसाठी विविध मशिनरींची कमतरता, नवीन दर्शन रांग व दर्जेदार शैक्षणिक संकुल सुरू करणे, 598 कायम कंत्राटी कर्मचार्‍यांचा प्रश्न, रुग्णांसाठी सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल, भक्तांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकल्पांची उभारणी अशी विविध विकास कामे संस्थानच्या माध्यमातून करून घेण्यासाठी त्यांना पाठपुरावा करावा लागणार आहे. असे असले तरीही त्यांच्या अनोख्या कार्यपद्धतीमुळे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्यांच्या कामाच्या अनुभवाचा संस्थानच्या विकास कामांसाठी नक्कीच फायदा करून देतील, अशी अपेक्षा भाविकांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या