मुंबई | Mumbai
अभिनेता सैफ अली खानवरील चाकू हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या वांद्रे येथील घरात ही घटना घडली आगे. मध्यरात्री चोरट्याने घरात घुसून हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल १० सेंटीमीटरची जखम झाली आहे. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. मध्यरात्रीच्या सुमारास सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याच्यावर सध्या सर्जरी सुरू असून दोन जखमा खोल असल्याचे समजते. याचदरम्यान हल्लेखोराविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
सैफ अली खानवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागल्या आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस कसून तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे. घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील ३ जणांचे जबाब नोंदवले जात आहेत.
सैफ अली खानने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याने सांगितले, रात्री दीडच्या सुमारास घरात हल्ला झाला. घरात हल्ला झाल्यानंतर चोराने लहान मुलाच्या रूममध्ये प्रवेश केला. घरातील देखरेखीसाठी असणाऱ्या महिलेने सगळ्यात आधी त्याला पाहिले आणि आरडा ओरड केला. यानंतर सैफ अली खान धावत आला. धावत आल्यानंतर त्याने चोरासोबत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झाली. झटापटीत चोराने चाकूने सैफ अली खानवर वार केला आणि तो पळून गेला.
घरातील महिलेवर संशय?
पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचे सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या मोलकरणीने आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर मोलकरणीवर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील जीवघेणा हल्ला केला.
दरम्यान हा हल्लेखोर घरातील महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित होता का ? तो आत कसा आला? तो चोरी करण्यासाठी आला होता का ? याचा पोलिस तपास करत आहेत. सैफ राहतो त्याच इमारतीत पॉलिशिंगचे काम सुरू आहे. ते काम करणाऱ्या व्यक्तींपैकी, कामगारांपैकीच कोणी हल्लेखोर आहे का याचा तपास पोलिस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांचे फोनही जप्त करण्यात आले आहेत.
सैफ अली खानचे वांद्रे येथे घर असून त्याच्या घराबाहेर टाइट सिक्युरिटी देखील असते. इतकी सिक्युरिटी असूनही सैफच्या घरात चोर कसा शिरला याचा शोध सुरू आहे. याचाच तपास करण्यासाठी क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायक हे सैफच्या घरी पोहोचले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक टीमही सैफच्या घरी पोहोचले आहे.
या घटनेबाबत सैफ अली खानकडून सांगितले की, अभिनेत्याच्या घरी चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम बाळगण्याची विनंती करतो. तो हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला होता, हल्ल्याचा उद्देश काय होता, याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. तो चोर होता की आणखी कोणी? त्याचा हेतू फक्त चोरीचा होता का? त्याला कोणी टार्गेट केले होते का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुन्हे शाखेचे पथक व्यस्त आहे.