बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात शिरलेल्या चोराकडून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हल्ल्याच्या पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सैफ अली खानला रुग्णालयातून घरी घेऊन जात असताना त्याच्यासोबत पत्नी करीना कपूरही दिसली. डॉक्टरांनी आणखी काही दिवस विश्रांती करण्याचा अभिनेत्याला सल्ला दिला आहे. त्यामुळे अभिनेत्याला काही दिवस चित्रपटाच्या शूटिंगपासून दूर राहावं लागणार आहे.
सैफ आणि त्याचे कुटुंब राहत असलेल्या सद्गुरु शरण बिल्डिंगमधील सुरक्षेची त्रुटी समोर आली आहे. त्यामुळे अभिनेता वांद्रे येथील फॉर्च्यून हाइट्स अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचं आलिशान अपार्टमेंट फॉर्च्यून हाइट्स मुंबईतील टर्नर रोडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तैमूर आणि जेह या जोडप्याच्या मुलांची खेळणी आणि सामान रात्रीच्या वेळी सद्गुरु शरण अपार्टमेंटमधून फॉर्च्यून हाइट्समध्ये नेण्यात आलं आहे. तथापि, सैफ अली खान, करीना किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच नाव शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहील्ला अमीन फकीर असं त्याचं नाव आहे. भारतात तो विजय दास हे नाव धारण करु राहत होता. रविवारी पहाटे त्याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली. कोलकात्ताचा निवासी असल्याच सांगून त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मूळ बांगलादेशचा रहिवासी असून काही वर्षांपासून अवैधरित्या भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले.