मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सैफवर धारदार शस्त्राने म्हणजेच चाकुने अनेक वार करण्यात आले आहेत. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सैफवर हा हल्ला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देश्याने एका अज्ञात व्यक्तीने वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या ११ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये घुसून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने वार केले. वांद्रे पोलिसांनी सांगितले की, सैफ जागा झाल्यावर आणि चोराशी झटापट झाल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला करून पळ काढला. बॉलिवुड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास धारदार शस्त्राने म्हणजेच चाकुने अनेक वार करण्यात आले आहेत. या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर १० सेंटीमीटरची जखम झाली आहे. दरम्यान ही घटना पाहता ही चोरी नव्हे तर सैफचा जीव घेण्याचा संशय येतोय.
Saif Ali Khan : अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला; पाठीत धारदार शस्त्र खुपसलं
नेमके प्रकरण काय आहे?
सैफच्या घरी चोर नेमका कसा शिरला, त्याच्यावर हल्ला कसा झाला, त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते, यासंदर्भातील तपास मुंबई पोलीस करणार आहेत. यासाठी ते सैफच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस सैफ अली खानच्या इमारतीतील सीसीटीव्ही आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही तपासत आहेत. हल्लेखोर कोण होता, तो कुठून आला आणि त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला केला, याबाबतची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. तर सैफवरील उपचारानंतर त्याचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. याप्रकरणी अद्याप सैफची पत्नी करीना कपूर किंवा इतर कुटुंबीयांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.
दरम्यान, रात्री “सैफ अली खानला मध्यरात्री ३.३० वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात आणले गेले. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा होत्या आणि त्यापैकी दोन खोलवर झाल्या आहेत. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि ॲनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत. सैफवर सर्जरी झाल्यानंतरच आम्ही अधिक माहिती देऊ शकू”, असे लिलावती रुग्णालयाचे सीईओ नीरज उत्तमणी यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा