श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
वारकरी संप्रदाय जातीयता मानत नाही. श्रीगोंद्यात संत शेख महंमद यांचा परंपरेने उत्सव साजरा केला जातो. संत शेख महंमद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारा आड येणार्या आमीन शेख नावाचा मीठाचा खडा बाजूला काढून टाकावा लागेल. संत शेख महंमद यांचे मंदिर हे वारकर्यासाठी इतिहास आणि अस्मितेचा प्रश्न आहे. मंदिराचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी श्रीगोंदा येथे केले.
श्रीगोंदा शहरातील संत शेख महमंद महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गावकर्यांनी, वारकर्यांनी श्रीगोंदा शहर कडकडीत बंद पाळून तहसील कार्यलयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले आहे. यावेळी हभप बंडातात्या कराडकर म्हणाले, संत परंपरेतून संत शेख महंमद यांना बाजूला जाऊ देणार नाही.
संत शेख महंमद यांचे आध्यात्मिक साहित्य ज्यांना मान्य नाही. तो त्यांचा वंशज कसा असेल. मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलतो. सरकारने गावकर्यांना बेमुदत धरणे धरण्याचा वेळ आणू नये. लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार सुरू व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. संत तुकाराम महाराज यांचे वंशज माणिक महाराज मोरे यांनी आमीन शेख यांना संत कळले नाहीत. त्यांना त्याचे वाड्मय माहिती नाही. शेख महंमद यांच्या समाधीला कान लावा. तुम्हाला आत्म साक्षात्कार होईल. मंदिराचे आता काम थांबणार नाही. हा विषय संपूर्ण वारकर्यांचा आहे. संत शेख महंमद यांनी भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी केली, असे सांगितले. खा. निलेश लंके यांनी समजाच्या भावना लक्षात घेऊन सरकारने दर्गाह ट्रस्ट तातडीने रद्द करावे, समाजाची भावना महत्वाची असल्याचे सांगितले. माजी आमदार बबनराव पाचपुते यांनी मंदिराच्या विषयात समोरची माणसे त्या पात्रतेची नाहीत. केवळ चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्री यांची वेळ घेतली आहे. मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतील, असा विश्वास व्यक्त केला.
आमदार विक्रम पाचपुते यांनी मंदिरासाठी संयम महत्वाचा आहे. आंदोलन हे ठिय्या आंदोलन आहे. शासन दरबारात प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसत नसेल तर तो कायदा बदलण्याचे काम जनभावना करत असते. संयमाने पुढे जायचे आहे. ज्या सूचना येतील त्या मान्य आहे. आंदोलनाची दखल शासनाने घेतली आहे. घनश्याम शेलार यांनी आमीन शेख यांनी देवस्थान मठाचे नाव बदलले रेकॉर्डवर सुफी संत हजरत शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट असे नाव बदलले आहे ते गावाला मान्य नाही, असे स्पष्ट केले. यावेळी राजेंद्र नागवडे यांनी शेख याने हेकेखोरपणा सोडावा.गावाला निर्णय घेण्याचे वेळ आली आहे. तो नाटक करतो, पण कृती करत नाही, असे सांगितले. यावेळी बाबासाहेब भोस, नाना कोथंबीरे, टिळक भोस, अरविंद कापसे, रंगनाथ बिबे, बाळासाहेब नाहटा, बाळासाहेब महाडिक, रामचंद्र महाराज दरेकर, प्रणोती जगताप, मनोहर पोटे आदींची भाषणे झाली.