अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
बीड जिल्ह्यातील साईराम मल्टिस्टेटमधील घोटाळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील नावाजलेल्या संत भगवान बाबा मल्टिस्टेटचा सहभाग आढळून आला असून चेअरमन मयूर वैद्य याला बीड पोलिसांनी संशयित आरोपी करताच त्याने पलायन केले आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार चव्हाट्यावर येताच भगवान बाबा मल्टिस्टेटच्या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘शुध्द नीती जोडते नाती’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणार्या भगवान बाबा मल्टिस्टेटच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
साईराम मल्टिस्टेट या संस्थेच्या घोटाळ्याचे एकूण सहा गुन्हे बीड जिल्ह्यात दाखल आहेत. सुमारे 100 कोटींच्या घोटाळ्याचा अंदाज आहे. या गुन्ह्याचा तपास बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यांनी या गुन्ह्याशी संबंधित तिघांना अटक केली आहे. साईराम मल्टिस्टेटच्या व्यवहारांची पडताळणी करताना मयूर वैद्य याच्या भगवान बाबा मल्टिस्टेट या संस्थेशी व्यवहार झाल्याचे व वैद्य याने पैशांची हेराफेरी करण्यात मदत केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्याचे गुन्ह्यात नाव येताच त्याने पळ काढला आहे. बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला चौकशीसाठी बोलावले होते. तो चौकशीला हजर राहिला. मात्र गुन्ह्यात नाव येताच त्याने पलायन केले आहे.
बीड पोलीस त्याच्या मागावर आहेत. मयूर वैद्य व त्याच्या संबंधित भगवान बाबा मल्टिस्टेटचे नाव साईराम मल्टिस्टेटमधील घोटाळ्याशी जोडले गेल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मल्टिस्टेटच्या नगर शहरासह शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी तसेच शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे शाखा आहेत. या शाखेत अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. बीड जिल्ह्यातील मल्टिस्टेटमधील घोटाळ्यात भगवान बाबा मल्टिस्टेटचा सहभाग समोर येताच या ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. आपल्या ठेवी सुरक्षित आहे का, असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे.
मयूर वैद्य व इतरांनी ‘शुध्द नीती जोडते नाती’ असे ब्रीद घेऊन संस्थेची वाटचाल सुरू केली. नगर शहरासह जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर आदी ठिकाणी त्याने शाखा काढल्या. ठेवीदारांचा विश्वास संपादन केल्याने अनेकांनी यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या. दरम्यान, आता मयूर वैद्य याचे बीड जिल्ह्यातील घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून नाव आल्याने ठेवीदारांच्या मनात आपल्या ठेवी सुरक्षीत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठेवीदारांबरोबर या मल्टिस्टेटच्या इतर संचालक आणि कर्मचार्यांमध्ये देखील यामुळे खळबळ उडाली आहे. चेअरमन पसार झाल्याने शाखेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नगरमध्ये घेतला आश्रय ?
मयूर वैद्य याचे गुन्ह्यात नाव येताच त्याने बीड सोडून पळ काढला. बीड पोलीस त्याच्या मागावर आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत अटक करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, वैद्य याने बीड सोडल्यानंतर नगरमध्ये आश्रय घेतला असल्याचे समजते. या गुन्ह्यातून कसे वाचता येईल यासाठी तो व त्याचे सहकारी प्रयत्न करत आहेत. त्याच्या अटकेनंतर मात्र भगवान बाबा मल्टिस्टेटचे काय होणार?असा प्रश्न आता पुढे आला आहे.