श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी घोड धरणातून पाणी देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावामुळे घोड लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.6) श्रीगोंदा येथे शेतकर्यांची बैठक झाली. या बैठकीत परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट केली. घोड धरणातील उपलब्ध पाणीसाठा आधीच अपुरा असून, सध्याच्या परिस्थितीत बाहेरील योजनेस पाणी वळविल्यास स्थानिक शेती, पिकांचे उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शेतकर्यांनी सांगितले की, घोड लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर शेती या धरणावर अवलंबून आहे. जर साकळई उपसा सिंचन योजनेस पाणी देण्यात आले, तर स्थानिक शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल आणि भविष्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की, घोड धरणातील पाणी हे प्रथम स्थानिक शेतकर्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवावे आणि कोणत्याही परिस्थितीत साकळई उपसा सिंचन योजनेस पाणी देऊ नये. यासंदर्भात शासनाला निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच, गरज भासल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीस परिसरातील प्रमुख शेतकरी, कार्यकर्ते व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राकेश पाचपुते, विजय शेंडे अजय वाबळे, राजेंद्र नागवडे, बापू भुजबळ, गोरख उंडे, सुभाष शिंदे, शहाजी इथापे आदी उपस्थित होते.
आता आरपारची लढाई
बारामाही सिंचन करणारे घोड धरण आता फक्त दोन तीन रोटेशनवर आल्याने आमचा शेतकरी उद्ध्वस्त होण्याचा मार्गावर आला आहे. त्यासाठी आम्हाला लढावे लागेल. आता आरपारची लढाई होईल.
– स्मितल वाबळे
तुम्हाला कोठून द्यायचं…
घोडच्या पाण्याचे जे रोटेशन येत आहेत त्याच्यातील फक्त आमच्या शेतकर्याला शेवटचे सहा ते सात दिवसच पाटचं पाणी मिळते ते पण टेलच्या शेतकर्याच्या बांधावर जाईपर्यंत मागे पाणी बंद होते, म्हणजे इथेच पोटाला पोटभर मिळेना, आणि तुम्हाला कोठून द्यायचं…
– गोरख उंडे
उन्हाळ्यात पाणी मिळेल याची खात्री वाटत नाही
साकळई उपसा सिंचन योजना व्हावी यासाठी आम्ही देखील आंदोलन केले आहे. योजना व्हायलाच पाहिजे. पण सध्या घोड धरणातील पाणी साठ्याची परिस्थिती पाहता उन्हाळ्यात पाणी मिळेल याची खात्री वाटत नाही. त्यामुळे घोड लाभ क्षेत्रातील शेतकरी भयभीत झाले आहेत. त्यासाठी शेतकर्यांना योग्य माहिती देणे गरजेचे आहे.
– टिळक भोस, जिल्हाध्यक्ष, स्वराज्य जनजागृती अभियान.
मार्ग न निघाल्यास कोर्टात जाणार
घोड धरणात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे साकळाई उपसा सिंचन योजना घोडवरून यशस्वी होणार नाही. त्यामुळे अभ्यासपूर्ण व प्रशासकीय लढाई लढून हा विषय मार्गी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांना भेटू. मार्ग न निघाल्यास कोर्टात जाउन लढाई लढू.
– अॅड.विठ्ठलराव काकडे





