Wednesday, February 4, 2026
HomeनगरNewasa : सलाबतपूर परिसरात दीडशे मिलीमीटर पावसाने पूरस्थिती

Newasa : सलाबतपूर परिसरात दीडशे मिलीमीटर पावसाने पूरस्थिती

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर परिसरात शनिवारी रात्री दीडशे मिलीमीटर पाऊस झाला. या अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. शनिवारी रात्रभर सलाबतपूर परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. सलाबतपूर मंडळात 149 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे गावालगतच्या नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती . पूरस्थितीमुळे जवळपास बारा तास पुलावरील रस्त्यावरून पाणी वाहत होते.

- Advertisement -

त्यामुळे दोन्हीं गावांचा संपर्क तुटला होता. त्यातच नदीलगत असलेल्या झोपडपट्टीत पुराचे पाणी शिरल्याने नागरीकांचे रात्री अतोनात हाल झाले. झोपडपट्टयांतल्या नागरीकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी वस्तुंचे तसेच कपडे अन्नधान्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे . पाण्याचा जोर इतका होता अबाल वृध्दांसह महिला व पुरुष सर्वांनाच रात्र जागून काढावी लागली. तर अनेकांनी पुराच्या भितीने दुसरीकडे स्थलांतर केले होते. मात्र कालच्या अतिवृष्टीमुळे व त्यामुळे नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गोरगरीबांचे संसार होत्याचे नव्हते झाले.

YouTube video player

तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करुन लागलीच जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना संपर्क करुन माहिती देऊन त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन पूरग्रस्त नागरीकांना दिलासा दिला. पुराच्या पाण्याने संपूर्ण गावाला वेढा घातला होता. अनेकांच्या चारचाकी, दुचाकी गाड्या पाण्यात गेल्याने गाड्यांचेही नुकसान झाले आहे. काल झालेल्या पावसाने खरीप पिकांचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपातील मका, सोयाबीन, कपाशी, बाजरी या पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

त्याचीही पाहणी करुन पंचनामे करण्यांचे आदेश यावेळी आमदार लंघे यांनी दिले. यावेळी सरपंच अझर शेख, ग्रामसेवक श्री. भिसे, कामगार तलाठी अश्फाक शेख, अशोकराव दाने, कैलास निकम, संभाजी पोटे, जावेद पठाण अंकुश काळे, ज्ञानेश्वर कदम, सागर धाडगे, राहुल काळे, सुनील नजन, बबलू दिवाकर, बबनराव तांबे, अशोकराव धाडगे, राजेंद्र मुंडलिक, बाळासाहेब निकम तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

पुराच्या पाण्यातून पलिकडे जाण्याची दोघा युवकांची जीवघेणी स्टंटबाजी

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी अवस्था काल सलाबतपूर येथे जीवघेणी स्टंटबाजी करणार्‍या दोन युवकांच्याबाबतीत घडली. मात्र उपस्थित तरुणांच्या प्रसंगावधनामुळे पुढील अनर्थ टळला. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने सलाबतपूर मंडलात 149 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली. या पावसाने सलाबतपूरसह परिसरातील ओढेनाले मध्यरात्रीपासूनच तुंडूब भरून वाहू लागले. त्यामुळे संपूर्ण सलाबतपूर गावही जलमय झाल्याचे चित्र होते. अनेकांची चारचाकी, दुचाकी वाहने जनावरे पाण्याखाली गेले होते. तर काही वाहने वाहुन गेली होती. पुराच्या पाण्याचा वेग झपाट्याने वाढत होता. त्यामुळे दोन्ही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. सकाळपर्यंत पाण्याने गावाला वेढा दिला होता. रात्रभर मुसळधार पाऊस व झालेल्या नुकसानीने नागरीक त्रस्त झाले होते.

1991 साली दोन्हीं गावात अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचे बुजूर्ग सांगत आहेत. तब्बल 34 वर्षानंतर ही परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येते. तर काल सकाळी 6 वाजल्यापासूनच पुराचे पाणी पाहण्यासाठी गावातील नागरीकांनी खडका शिरसगांव रस्त्यावरील व गोगलगाव- सलाबतपूर रस्त्यावरील पुलावर गर्दी केली होती. यावेळी अनेक तरुण आपल्या मोबाईलवर प्रचंड वेगाने वाहणार्‍या पाण्याचे चित्रिकरण करण्यात व्यस्त होते. खडका-शिरसगाव पुलावर कमरेच्यावर पाणी असतानाही पैलतिराला जाण्यासाठी प्रयत्न करत होते.

तेथील उपस्थितांनी त्यांना पलिकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर एकमेकांचा सहारा घेत पाण्यातून पलिकडे जाण्याची स्टंटबाजी करताना मधोमध जाताच दोघांचा तोल जावून दोघेही प्रचंड वेगाने वाहणार्‍या पाण्यात पडले. दैव बलवत्तर म्हणून दोघेही दोन दिशेला झाडाच्या फांदीला अडकले. तेथील उपस्थित तरुणांनी प्रसंगावधन राखून दोरखंडाच्या साहाय्याने दोघांनाही वाचवले. जवळपास एक तास हे थरारनाट्य चालले. या तरुणांच्या नातेवाईकांसह मित्र परिवार त्यांचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने आटापिटा करताना दिसत होते. तर दोनशेपेक्षा जास्त तरूण थरारनाट्याची शुटींग करण्यांत व्यस्त होते.

शुटींग करणार्‍यांना खरच जीव वाचवण्यापेक्षा सोशलवर आपली टिमकी वाजवण्यात रस आहे का? एखादा मरणाच्या दारात असताना त्याला वाचण्यापेक्षा तिथली परिस्थिती शूट करुन फोटो काढून सोशलवर व्हायरल करुन खिल्ली उडवणं कितपत योग्य आहे? की या सोशलच्या जमान्यात तरुणांमधली जिगर संपत चाललीय की माणुसकी? हा न उमगणारा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या