नाशिक । प्रतिनिधी
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला ज्या समाज कल्याण कार्यालयाच्या हॉस्टेल मध्ये ठेवण्यात आले होते या हॉस्टेलमध्ये चारशे पेक्षा अधिक जण वास्तव्यास आहेत. त्यामुळे समाजकल्याण परिसर सील केला असून जवळपास येथील ४०० आणि तीन किमी परीघ असलेला परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेनंतर नाशिक पुणे वाहतूक तसेच मुंबई नाक्याकडून द्वारकाच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे कोलमडलेली दिसून आली. लांबच लांब वाहनांच्या रांगा याठिकाणी लागलेल्या दिसून आल्या.
नाशिक जिल्ह्यातील करोना रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय बनलेला असतांनाच बुधवारी (दि.16) शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहातील निवारा केंद्रातील एका व्यक्तीस करोना झाल्याचे समोर आल्याने महापालिका यंत्रणा खडबडुन जागी झाली आहे. या रुग्णांमुळे आता शहरातील रुग्णांची संख्या चार झाली आहे. ज्या निवारा केंद्रात हा प्रकार उघड झाला, तो भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे.
नाशिक शहरात गोंविंदगर भागात पहिला करोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर गंगापूररोड नवश्या गणपती परिसरात, नंतर नाशिकरोड धोंगडेनगर आणि आता नासर्डी पुलजवळील समाज कल्याण विभाग वसतीगृह याठिकाणी जिल्हा प्रशासनाकडुन उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रात करोना बाधत व्यक्ती आढळून आला आहे.
ही व्यक्ती नवी मुंबई भागात सेक्टर – 4 मधील संदाना याठिकाणी ट्रकवर क्लिनर म्हणुन काम करीत होता. लॉकडाऊन झाल्यानंतर तो मुंबई पुणे मार्गाने 30 मार्च रोजी नाशिकमध्यें आला होता. 13 एप्रिलला अंग व डोकेदुखीचा त्रास झाल्याने त्यास डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी समाजकल्याण वसतीगृह परिसर केंद्रीत धरुन चार बाजुस 600 मीटर रेड झोन व पुढचे 400 मीटर अंतर बफर झोन जाहीर केला आहे.
या प्रतिबंधीत क्षेत्रात मंगळवारीच निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले असुन स्वच्छेतेचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. या निवारा केंद्रात 318 जणांना ठेवण्यात आले असुन यात करोना बाधीत रुग्णांच्या जवळ असलेल्या 8 जणांना अतिजोखमीच्या व्यक्ती म्हणुन त्यांना डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन उर्वरितांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांची तपासणीचे काम करण्यात आले असुन या भागात 10 पथकांकडुन सर्वेक्षणाचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरू करण्यात आले आहे.