मुंबई । Mumbai
महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानाचे आज विधानसभेत पडसाद उमटले आहेत. विधानसभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडेंचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती. थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल.
August 2023 Bank Holidays : बँकांशी संबंधित कामे करून घ्या; ऑगस्टमध्ये १४ दिवस बँका बंद, पाहा संपूर्ण यादी
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर ते बाहेर कसे फिरू शकतात. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत भिडेंना अटक केली पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
संभाजी भिडे काय म्हणाले होते?
अमरावती शहरातील बडनेरा मार्गावर असलेल्या जय भारत मंगलम या ठिकाणी संभाजी भिडेंच्या सभेचं २७ जुलै रोजी रात्री आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना भिडेंनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. संभाजी भिडे म्हणाले की, महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते. संभाजी भिडे एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे, असं विधान भिडे यांनी केले.