Friday, November 22, 2024
Homeनगरवाळूतस्करीतून गुंडगिरी व गुंडगिरीतून पुन्हा वाळूतस्करी!

वाळूतस्करीतून गुंडगिरी व गुंडगिरीतून पुन्हा वाळूतस्करी!

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

गेल्या काही वर्षात वाळूतस्करीतून मुक्त झालेल्या नेवासा तालुक्यात वाळू तस्करांनी पुन्हा आपले बस्तान बसवण्यास सुरू केली असून याला कारणीभूत महसूल आणि पोलीस खाते आहे. गुंडगिरीतून वाळूतस्करी आणि पुन्हा वाळूतस्करीतून गुंडगिरी असे समिकरण तालुक्यात तयार होताना दिसत आहे. यामुळे तालुक्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून या विरोधात आता जनतेसह राजकीय पातळीवरून लढा उभारणे ही काळाची गरज बनली आहे. तसे न झाल्यास घोगरगावातील वाळूप्रकरणातून तालुक्याची वाटचाल पुन्हा गुन्हेगारीच्या इतिहासाकडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील घोगरगाव परिसरात महसूल विभागाच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या सहकार्याने वाळूतस्कारांनी उच्छाद मांडलेला आहे. शासनाचा मोठा महसूल बडवून हजारो ब्रास वाळूची तालुक्यातील गोदावरी पात्रातून तस्करी झालेली आहे. याला घोगरगाव ग्रामस्थ साक्षीदार असताना ही वाळू नगर जिल्ह्याच्या नव्हे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरच्या हद्दीतून होत असल्याचा शोध महसूल विभागाने लावला आहे. हद्दीचा मुद्दा पुढे करत महसूल विभाग एक प्रकारे तालुक्यातील वाळूतस्करीला प्रोत्साहन देत असल्याची तालुकाभर चर्चा आहे. दुसरीकडे गंगापूर भागातून चोरून काढलेल्या वाळूची नेवासा तालुक्यातील घोगरगाव हद्दीतून वाहतूक सुरू असताना ही अडवण्याची अथवा साधी चौकशी करण्याचे धाडस महसूल अथवा पोलीस प्रशासनाने दाखवलेले नाही. यावरून या वाळू तस्करीला कोणाचे वरदहस्त आहेत हे सर्वांच्या लक्षात येत आहे.

वाळूतस्करी आणि अवैध वाहतुकीमुळे घोगरगाव परिसरात रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. तसेच शेतकर्‍यांच्या विजेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. वाळूतस्करांच्या अजस्त्र वाहनांच्या धडकेत या भागातील विजेचे रोहित्र जळून खाक झाले होते. यामुळे ऐनवेळी पाण्याची गरज असताना शेतकर्‍यांना विजेअभावी अडचणीला समोरे जावे लागत आहे. या सर्व बाबीला जबाबदार कोण? असा सवाल तालुक्यातील जनता उपस्थित करत असून ग्रामस्थांचा विरोध असताना त्यांच्या रस्त्यांचे शेती पाईपलाईनच्या नुकसानीकडे महसूल खाते मूग गिळून बघ्याची भूमिका का घेत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटताना दिसत आहे.

तालुक्याचा पूर्व इतिहास पाहता काही वर्षांपूर्वी याठिकाणच्या वाळूतस्करी आणि गुंडगिरीचा अनुभव जिल्ह्याने अनुभवलेला आहे. यातून निर्माण होणार्‍या कायदा आणि सुव्यस्थेचा विषय संपूर्ण राज्यात गाजलेला आहे. मात्र, काळाच्या ओघात चित्र बदलेले असताना पुन्हा तालुक्यात वाळूतस्करांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून याला महसूल आणि पोलीस जबाबदार राहणार असल्याचे जनतेचे म्हणणे आहे. यामुळे पुन्हा तालुक्याचा इतिहास वर्तमान म्हणून समोर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

वाळूतस्करांचे तालुक्याबाहेर कनेक्शन
या वाळूतस्कर आणि गुंडगिरीचे तालुक्याबाहेर कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. वेळीच हे कनेक्शन तोडण्यासोबत वाळूतस्करी रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा शेतकरी आणि सामान्य नागरिकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या