संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
जीवाचा आटापटा करून पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर वरिष्ठांचा फोन खणखणताच सोडून देण्याची नामुष्की एका पोलीस पथकावर आली. ही घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील साकुर चौफुली परिसरात घडली.पकडलेला वाळूचा ट्रॅक्टर सोडून देण्यात आल्याने पठार भागामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळूतस्करी बाबत कठोर भूमिका घेतली असली तरी पठार भागातील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा सुरूच आहे. काल रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका ट्रॅक्टर मधून वाळूची वाहतूक केली जात होती. यावेळी वरिष्ठ अधिकार्यांचे पोलीस पथक गस्त घालत होते. वाळूचा ट्रॅक्टर पाहत असताना ट्रॅक्टर अडविला.
पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाची चौकशी केली. ट्रॅक्टरच्या मालकाची त्याने माहिती दिली. पोलिसांची कारवाई सुरू असताना ट्रॅक्टर चालकाने आपल्या मालकाला माहिती दिली. ट्रॅक्टरचा मालक हा पठार भागातील प्रतिष्ठित नागरिक असल्याने त्याने वरिष्ठ अधिकार्यांना ट्रॅक्टर पकडला असल्याची माहिती दिली. यानंतर काही अधिकार्यांनी त्वरीत फोन करून ट्रॅक्टर सोडून देण्यास सांगितले. पोलिसांनी ट्रॅक्टर सोडून देण्यापूर्वी संबंधितांकडून आपला खिसा गरम करुन घेतल्याची चर्चा आहे.
संगमनेर शहरातील कोणत्या वरिष्ठ अधिकार्याने पोलीस पथकाला कारवाई थांबविण्यास सांगितले? आणि हा ट्रॅक्टर कोणाचा? याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. संगमनेर तालुक्यातील मुळा व प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी सुरू आहे. याबाबत कारवाई करण्याची जबाबदारी महसूल खात्याची असताना महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी यांचे या वाळूतस्करीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे.