Saturday, November 23, 2024
Homeक्राईमNashik News: 'पुष्पा' ची थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बंगल्यात घुसखोरी; चंदनचोरांचे थेट...

Nashik News: ‘पुष्पा’ ची थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बंगल्यात घुसखोरी; चंदनचोरांचे थेट नाशिक पोलिसांना आव्हान

दराेडखाेरांनी केला चाेरीचा प्रयत्न

नाशिक। प्रतिनिधी
कन्नड येथील चंदनतस्करांच्या टोळीस एलसीबीने गजाआड केले असतानाही थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. दरोडेखोर चंदनचोरांनी महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीतील सुरक्षारक्षकास धमकावत चंदनाचा बुंधा चोरुन नेला. त्या गुन्ह्याचा अद्याप छडा लागला नसतानाच थेट शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील एसपींचे निवासस्थान लक्ष करुन चंदनचोरांनी शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे. तर, पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

नाशिक जिल्हा पोलिस प्रमुखांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात सहा दरोडेखोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानातील चंदन चोरी करण्यासाठी आलेल्या संशयितांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. याप्रकरणी दोन संशयितांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांत दरोड्याच्या प्रयत्नाची फिर्याद देण्यात आली. सरकारवाडा पोलिसांत उगलाल प्रधान चौरे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शरणपूर रस्त्यावरील ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या शासकीय निवासस्थानात चंदन चोरीसाठी दरोड्याचा प्रयत्न झाल्याचा सहा अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

- Advertisement -

त्यानुसार, ५ ऑगस्ट रोजी पहाटे २.४५ ते ३.३० या कालावधीत सहा अज्ञातांनी हातात लोखंडी रॉड, दांडके, दगडे व कटर मशिनसह अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील पोलिस वेळीच सावध झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. याप्रकरणी, १० ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, ‘एसपीं’च्या बंगल्यात दरोड्याचा प्रयत्न झाल्याने स्थानिक गुन्हे शोध पथकाने संशयितांचा माग सुरू केला आहे. त्यानंतर संशयितांपैकी दोघांना ताब्यात घेत ओझरच्या गुन्ह्यात अटक केल्याचे उघड करण्यात आले. त्यानंतर एसपींच्या बंगल्यातील दरोड्याच्या प्रयत्नातील कबूली संशयितांनी दिल्यावर ही फिर्याद देण्यात आल्याचे कळते. यासह सन २०२२ मध्ये २५ किलो चांदी लूटण्याचा प्रकार अधीक्षकांच्या घरासमोर घडला होता. त्या गुन्ह्याची उकल अद्याप झालेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या घरापर्यंत पोहोचून चोरटे बिनधास्त गुन्हे करीत असल्याने पोलिसांच्याच सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

३० जणांच्या टोळ्यांचा सहभाग
शहर आणि जिल्ह्यात गेल्या आठवडभरात चंदनचोरीचे पाचहून अधिक गुन्हे नोंद आहेत. त्यातील केवळ ओझर येथील गुन्हा उघड झाला आहे. तर, शहर आणि जिल्ह्यात परभणी, सिल्लोड, जालना, भुसावळ, जळगाव आणि इतर जिल्ह्यातील चंदनतस्करांच्या चार ते पाच टोळ्या कार्यरत झाल्याचे समोर येत आहे. याआधी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या बंगल्यात, तसेच सेंट्रल जेलचे कारागृह अधिक्षक, आयुक्तांचे निवासस्थान व अन्य ठिकाणांहून चंदनाची चोरी झाली आहे. या विविध टोळ्यांत ३० जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या