Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रNashik Teacher Constituency Election 2024 : संदीप गुळवेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

Nashik Teacher Constituency Election 2024 : संदीप गुळवेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

पक्षप्रवेश करताच मिळाली उमेदवारी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) मतदान पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाचा मोर्चा हा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे वळला आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर काही राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेने नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक शिक्षक मतदारसंघातून कॉंग्रेसचे दिवंगत नेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव अ‍ॅड. संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली आहे.

हे देखील वाचा Vidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदार संघासाठी तीन अर्ज दाखल

अ‍ॅड. संदीप गुळवे यांनी आज मुंबईत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माजी मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती जाधव संजय चव्हाण यांच्यासह आदींच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी पक्षप्रवेशानंतर बोलताना संदीप गुळवे म्हणाले की, माझा आज प्रवेश करून घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो. आज माझा प्रवेश करून शिक्षकांची सेवा करण्याची संधी दिली आहे, माझी उमेदवारी जाहीर केली आहे. हा विश्वास मी सार्थ ठरवेल. नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मी जिंकून आणेल. ही संधी मला दिली त्याबद्दल मी आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : Nashik Teacher Constituency Election 2024 : मविप्र संचालक अ‍ॅड. संदीप गुळवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर?

दरम्यान, गुळवे यांनी उमेदवारी मिळविल्यानंतर त्यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले आहे. दराडे हे गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. मात्र, आता शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने दराडे यांना डावलून कॉंग्रेसच्या गुळवे यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता दराडे यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दराडे यांच्या नावाची शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी चाचपणी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने यंदा दराडे यांचा पत्ता कट केल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी १०० टक्के विजयी होईल – संदीप गुळवे

यावेळी बोलतांना गुळवे म्हणाले की, मी तयारी काँग्रेस पक्षातून केली होती. मात्र बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, ही जागा शिवसेनेला सुटली तरी सुद्धा आमचे उमेदवार हे संदीप गुळवे असतील. त्यानुसार शिवसेनेला नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा सुटली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करूनच मी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे मला आव्हान वाटत नाही. कारण सहा वर्षात त्यांचे कामकाज बघितले तर नकारात्मक वातावरण संपूर्ण मतदारसंघात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी १०० टक्के विजयी होईल, असे संदीप गुळवे यांनी म्हटले.

सुधाकर बडगुजरांचा किशोर दराडेंवर निशाणा

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की, संदीप गुळवे हे एक उभरते नेतृत्व आहे. किशोर दराडे ज्यांना मागच्यावेळी आपण निवडून दिले ते आता आपल्यात दिसत नाही. ते आता पाठिंबा मागत फिरत आहे, असे म्हणत त्यांनी दराडे यांच्यावर निशाणा साधला. तसेच हा मतदार संघ आपण जिंकू हा असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे, असेही बडगुजर म्हणाले.

संदीप गुळवे नेमके आहेत तरी कोण?

अ‍ॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून ते नाशिक जिल्हा परिषदेचे २०१२ ते २०१७ पर्यंत सदस्य होते. महाराष्ट्रातील बलाढ्य शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेचे ते संचालक आहेत. तसेच त्यांनी नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कामगिरी बजावली आहे. याशिवाय ते जिल्ह्यातील विविध सहकारी, शिक्षण व कृषी संघटनांशी निगडीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या