अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
माजी महापौर संदीप कोतकर यांची केडगाव दुहेरी हत्याकांडातील जिल्हाबंदी हटवण्याच्या जिल्हा न्यायालयातील मागणी अर्जावर गुरूवारी एम. एच. शेख यांच्यासमोर युक्तीवाद पूर्ण झाला. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून आज, शुक्रवारी यावर निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सरकारी वकिल अर्जुन पवार यांनी दिली. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर ताणल्या गेलेल्या नगर शहर विधानसभेचा महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे.
माजी महापौर संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जिल्हाबंदी लागू करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ती 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीसाठी ही अय शिथिल करण्याचा आदेश दिला आहे. मात्र कोतकर केडगाव दुहेरी हत्याकांडातही संशयित आरोपी आहेत. या खटल्यातही न्यायालयाने त्यांना सुनावणीच्या तारखेशिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केलेली आहे.
ही जिल्हाबंदी हटवण्याची मागणी करणारा अर्ज कोतकर यांनी वकील विवेक म्हसे यांच्यामार्फत 15 सप्टेंबरला दाखल केला. त्यावर काल, गुरूवारी सुनावणी झाली. संदीप कोतकर सुनावणीच्या वेळी स्वत: हजर होते. सरकारी वकील पवार यांनी सरकार पक्षातर्फे युक्तीवाद केला. तर कोतकर यांच्या वतीने म्हसे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने म्हणणे ऐकुण घेत निर्णय राखून ठेवला आहे. आज, शुक्रवार निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नगर दक्षिणेत नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा या प्रमुख मतदारसंघासह शेवगाव-पाथर्डी मोठ्या प्रमाणात बंडखोरीची शक्यता आहे. ही बंडखोरी महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकुदुखी ठरणार असून महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते बंडखारांचा बंदोबस्त कसा करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत.
उध्दव ठाकरे यांनी डोळ्यावर बांधलेली पट्टी काढावी. निष्ठा आणि प्रामाणिक असणार्यांनाच न्याय द्यावा. खा. संजय राऊत यांच्या तडजोडीच्या निर्णयामुळे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे मोठे नुकसान होईल, असे सांगत माजी आमदार राहुल जगताप यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा काल कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली. मला उमेदवारी मिळाली नाही याचा आनंद बबनराव पाचपुते यांनाही झाला आहे. त्याच्या आंनदात विरजण टाकण्याचं काम करणार असे यावेळी जगताप म्हणाले.
श्रीगोंदा शहरात काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनीही मेळावा घेत महाविकास आघाडीत श्रीगोंद्याची जागा शिवसेना उध्दव ठाकरे गटाला गेल्याने आपली दावेदारी असताना जागा मिळाली नसल्याचे सांगत विधानसभा लढणार असे घोषित केले.