Friday, May 3, 2024
Homeब्लॉगशिक्षण जीवनाचा अविभाज्य भाग

शिक्षण जीवनाचा अविभाज्य भाग

शिक्षण जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जीवनाभिमुख असलेले शिक्षण हे कलहमुक्त आणि तणाव शुन्य असते.ज्या शिक्षणात भिती,तणाव आणि व्देष सामावलेले असते ते मुळीच शिक्षण नाही. याच वृत्ती शिक्षणांच्या प्रक्रियेतून विकसित होत असतील , तर शिक्षणांचा मार्ग बदलण्याची गरज आहे.जीवन हे आनंदमय आहे.

त्यात कलह नाही. मग जे जीवनात कलहाचे आस्तित्व आहे त्याचे कारण काय आहे? तर जीवनाच्या ध्येयापासून आणि शिक्षणांच्या मूळ विचारापासून दूर चालत जाणे घडत असल्याचे ते परिणाम आहेत. आपले आस्तित्वच मुळतः ज्या धारणेसाठी आहे, ती धारणा सोडून आपण आणखी काही मिळविण्याची वेगळ्या वाटा चालू लागलो, की दुःख निश्चित आहे असे समजावे. शिक्षणाचे देखील तसेच आहे, म्हणून विनोबाजी म्हणत असे “कुरूक्षेत्रावर जशी गीता असते तशी जीवन क्षेत्रावर शिक्षण असायला हवे” शिक्षण हेच जीवनासाठी तत्वज्ञानाची वाट दाखविणारी प्रकाशवाट आहे.

- Advertisement -

कुरूक्षेत्रावर आपले कर्तव्य बजावत असतांना अर्जुनापुढे काही प्रश्न निर्माण झाले होते. त्याचे उत्तर शोधत असतांना श्रीमद्भभगवतगीता निर्माण झाली. प्रश्नाचा शोध घेतांना मिळालेल्या उत्तराने जगण्याची शक्ती, दृष्टी आणि विचार मिळाले. त्यातून जगण्याच्या दिशेचा प्रवास अधोरेखित झाला.

ज्या शिक्षणात जगण्याची दृष्टी नाही ते जगणे केवळ निर्थक आहे. मुळतः शिक्षणाचा विचारच जीवनाची समृध्दता आणि जीवन दृष्टी बहाल करणे आहे. मात्र मॅकोलेच्या विचार धारेने या देशातील शिक्षणाकडे पाहाण्याच्या दृष्टीत बदल घडवून आणला आहे. वर्तमानात शिक्षणांचा विचार अक्षर साक्षरेपुरता मर्यादितच आहे. मार्कांची स्पर्धा निर्माण झाली आहे. जीवनात आर्थिक सुब्बता आणण्याचा विचार प्राधान्यांने केला जाऊ लागला आहे. मानवी जीवन मूल्यांमध्ये देखील काळाच्या ओघात बदल घडतो आहे. प्रतिष्ठेच्या कल्पना बदलल्या आहेत. जागतिकीकरण, उदारीकरण, मुक्त अर्थव्यवस्थेने सर्वच मूल्यांची भाषा बदलवली आहे.

कधीकाळी समाजात सरस्वती शिरसावंदय मानली जात होती. समाजात बुध्दीवान, विचारवंत महत्वाचे व प्रतिष्ठित म्हणून गणले जात होते. त्यांना सन्मान मिळत असल्यांने अनेकांना त्या वाटेने जाणे महत्वाचे वाटत होते. त्यासाठी कष्ट घेण्याची वृत्त्ती विकसित झाली होती. घरात पुस्तके असणे, वाचन संस्कारात जीवन व्यतीत करणे हा संस्काराचा भाग होता. अलिकडे सरस्वतीचे उपासकांपेक्षा लक्ष्मीची वाट महत्त्वाची बनली आहे. तीला प्रतिष्ठा मिळत असल्यांने त्या दिशेने प्रवास घडू लागला आहे.

आपल्या अवतीभोवती जे दिसते त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे महाविद्यालयात शिकत असतांना अनेक लेखक, विचारवंत यांचे दर्शन व्हायचे. त्यांच्या पाऊलवाटा समजाऊन घेतांना आपला जीवन प्रवास थिटा व्हायचा. त्यांच्या ज्ञानाच्या साधनेने आश्चर्य वाटायचे. त्यांच्या ज्ञान वाणीने विद्यार्थी चिंब चिंब होऊन जायचे. त्यांनी चाललेल्या मूल्यांची पाऊलवाटेचे कौतूक वाटायचे. यशासाठी कोणताही शार्टकट नसतो हे जाणवयाचे. ती वाट कठिण असली तरी ती अशक्यप्राय नाही हे उमजायचे. त्यामुळे त्या वाटेने जात अनेकांनी आपल्या सिध्द केले आहे. अलिकडे हे चित्र शिक्षणातून हददपार होऊ लागले आहे.

शाळा महाविद्यालयाच्या व्दारातून आता सरस्वतीचे उपासक जणू हददपार झाले आहेत. त्या ठिकाणी येणा-या लक्ष्मीपतींच्या होणा-या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांनी ती वाट आकर्षित करीत असेल तर विद्यार्थ्यांची चूक काय..? खरेतर लक्ष्मीपतींची वाट चालणे चूकीचे नाही.. पण तो मार्ग नेमका कोणता आहे हे लक्षात घेऊन चालायला हवे. आपल्या नैतिकतेला धक्का लावत प्रवास सुरू ठेवणे म्हणजे केवळ चालणे ठरेल. म्हणून कोणत्याही वाटेचा प्रवास हा आपल्या जीवनमूल्यांना धक्का लावणारा असता कामा नये. हा विचार हददपार झाल्यांने समाजजीवनात एक प्रकारे पोकळी निर्माण झाली आहे. त्या पोकळीने अनेक प्रश्न चिन्ह निर्माण केले.

शिक्षणाने समाज कसा हवा याचे दर्शन घडवायचे असते. शिक्षणाच्या प्रक्रियेत जे सुरू असते तेच समाजात प्रतिबिंबीत होत असते. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत विचाराची पेरणी महत्वाची आहे. आपण मुलांच्या समोर कोणाला उभे करतो आहोत, त्याची विचाराची पेरणी आणि स्वतःची जडणघडण कशी आहे ते महत्वाचे आहे. त्यामुळे शिक्षण जीवनाशी नाते सांगते का? याचा विचार करायला हवा.

आरंभी आपण जे करतो, पेरतो तोच विचार महत्वाचा आहे. अन्यथा आज नाही पेरले तर उद्या उगविणार नाही. जे काही करायचे आहे, आपल्याला जे राष्ट्र निर्माण करायचे आहे त्यासाठीची पायाभरणी नियमित व प्रत्येक टप्प्यावरती करावा लागत असते. आज नाही तर उद्या महाविद्यालयात गेल्यावर विद्यार्थी शिकेल असे म्हणून आरंभीच्या टप्प्यावरती होणारे दुर्लक्ष परवडणारे नसते. आपणाला उद्या जे काही हवे आहे, ते लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावरती पेरणी करायला हवी. विनोबा म्हणत असे, की मातीचा पुतळा बनवायचा असेल तर आरंभीच मातीचे उपयोग करून आकार देण्यास सुरूवात करायला हवी.

आरंभी मातीला आपण कसाही आकार दिला तरी पुढे गेल्यावर त्या मातीला आपण जो आकार देऊ इच्छितो तो देता येईल, म्हणून आरंभी दुर्लक्ष केले तरी चालेल असे म्हणणे योग्य नाही. पण असे न घडता आरंभापासूनच मातीत आपणाला जी मूर्ती निर्माण करायची आहे त्या मूर्तीचा आकार दर्शित व्हायला हवा आहे. हातातील मातीचा गोळा पाहिल्यानंतर त्यातून काय तयार होणार हे आकार देण्यास आरंभ झाल्यानंतरच कळायला हवे..

जीवनात शिक्षणांचा आरंभ झाल्यापासून आपण माणूस निर्मितीचा विचार करायला हवा असतो. शिक्षणातून साक्षरता येईल. मात्र मूळ उददेश लक्षात घेऊन पावले टाकणे महत्वाचे आहे. कारण माणूस निर्माण झाला तरच आपण राष्ट्र निर्माण करू शकतो.

नेहमी एक उदाहरण दिले जाते, एकदा विद्यार्थ्यासमोर एक नकाशा फाडला. त्याचे असंख्य तुकडे करण्यात आले. त्यानंतर तो नकाशा जोडण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी प्रयत्न केले, पण नकाशा जोडला जाईना. मात्र एक विद्यार्थी नकाशा जोडण्यात यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यांने तो नकाशा जोडला तेव्हा तो कसा जोडला? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला,” मी राष्ट्राचा नकाशा जोडण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी त्या नकाशाच्या पाठीमागे माणंसाचे चित्र होते. त्या माणंसाला जोडले आणि पाठीमागे असलेले राष्ट्राचे नकाशे आपोआप जोडला गेला. त्यामुळे आपण शिक्षणातून माणूस जोडण्याचे काम केले तर राष्ट्र आपोआप जोडले जाते. त्यासाठी मात्र आरंभापासूनच पेरणी करण्याची गरज आहे. प्रत्येक टप्प्यावरती कमी अधिक प्रमाणात विचाराची पेरणी करावी लागते. या ठिकाणी केवळ कोरड्या विचाराची पेरणी करून शिक्षण यशस्वी होत नाही. त्या करीता विचार रूजण्यासाठी मनाची मशागत करावी लागेल. त्या मशागतीतून जे पेरले जाणार आहे ते उगविणार आहे. ती मशागत देखील केवळ जीवन शिक्षणातून होत असते. त्यामुळे शिक्षण जीवनाशी नाते सांगणारे असावे. शिक्षण जीवनाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपयोगी पडले तरच शिक्षणांची गरज वाटेल. आज शिक्षण घेतलेली माणंस आपल्या आयुष्यातील समस्या निराकरण करू शकत नसतील. विवेकाने वर्तन करू शकत नसतील, तर जीवनात शिक्षणांचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होणार आहे.

समस्या निराकरणाचा विचार शिक्षणात अधोरेखित झाला तरच पुढील प्रवास अधिक गतीमान होणार आहे.त्यामुळे शिक्षणाबाबत आपण अधिक जागृत राहायला हवे. अन्यथा पदव्यांची कागद घेऊन ही जीवनसत्त्वहीनतेने जगणे घडते आहे..

संदीप वाकचौरे

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहे.)

- Advertisment -

ताज्या बातम्या