Tuesday, January 6, 2026
Homeनगरसंगमनेरात सिंह-वाघाच्या लढाईत 'सिंहाची' डरकाळी; डॉ. मैथिली तांबे यांचा ऐतिहासिक विजय, मामा-भाच्याने...

संगमनेरात सिंह-वाघाच्या लढाईत ‘सिंहाची’ डरकाळी; डॉ. मैथिली तांबे यांचा ऐतिहासिक विजय, मामा-भाच्याने मैदान मारलं!

संगमनेर । प्रतिनिधी

गेल्या चार दशकांतील सर्वात चुरशीची आणि प्रतिष्ठेची मानली गेलेली संगमनेर नगरपरिषद निवडणूक अखेर तांबे-थोरात परिवाराने ऐतिहासिक बहुमताने जिंकली आहे.

- Advertisement -

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या ‘हाय-व्होल्टेज’ रणसंग्रामात ‘संगमनेर सेवा समिती’च्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तब्बल १६,४०८ मतांनी दणदणीत विजय मिळवला. ही निवडणूक केवळ स्थानिक नगरपालिकेची नसून ‘तांबे-थोरात विरुद्ध खताळ-विखे’ अशा दोन बड्या राजकीय घराण्यांतील अस्तित्वाची लढाई बनली होती. मात्र, मतदानाच्या पहिल्या फेरीपासूनच डॉ. मैथिली तांबे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळवले.

YouTube video player

नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही संगमनेर सेवा समितीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, एकूण जागांपैकी तब्बल २७ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा केवळ १ आणि २ अपक्ष उमेदवार विजयी झाले, तर उर्वरित सर्व जागांवर ‘तांबे-थोरात’ गटाने विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला.

महायुतीकडून सुवर्णा खताळ यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठी ताकद लावली होती; परंतु संगमनेरच्या मतदारांनी बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावरच पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली. या विजयामुळे संगमनेरचा गड अभेद्य असल्याचे सिद्ध झाले असून, शहरात विजयाचा गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे.

ताज्या बातम्या