Saturday, September 28, 2024
Homeनगरसंगमनेर खुर्द परिसरातील जमिनीचे बिनताबा साठेखत वादग्रस्त ठरणार?

संगमनेर खुर्द परिसरातील जमिनीचे बिनताबा साठेखत वादग्रस्त ठरणार?

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील संगमनेर खुर्द परिसरातील एका जमिनीचे लाखो रुपयांच्या बदल्यात झालेले बिनताबा साठेखत वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सातबारा उतार्‍यावर नावे नसणार्‍यांनी परस्पर या जमिनीचा व्यवहार केला असल्याने यात सहभागी झालेले अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

संगमनेर खुर्द येथील या वादग्रस्त मालमत्तेची 83 लाख 20 हजार रुपयांना विक्री करण्यात आली आहे. ठरलेल्या व्यवहारापैकी 35 लाख रुपयांचा संबंधित व्यक्तींनी विसार दिला आहे. तिघांनी येथील नवले परिवारासोबत या जमिनीचा व्यवहार केला आहे. संगमनेर खुर्द परिसरातील या दीड हेक्टर जमिनीवरील उतार्‍यात फक्त दोन जणांची मालकी दिसून येते. या जमिनीच्या उतार्‍यावर म. ज. म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार हस्तांतरणास बंदी असा उल्लेख आहे. असे असतानाही या जमिनीचे 5 मार्च 2024 रोजी साठेखत करण्यात आले आहे. तिघांनी या जमिनीचे बिनताबा साठेखत करून घेतले असून माजी नगराध्यक्षांचा मुलगा, अनधिकृत सेतू कार्यालय चालवणारा इसम व संगमनेर खुर्दमधील एका व्यावसायिकाचा यात समावेश आहे.

साठेखत लिहून देणार्‍याचे नाव या उतार्‍यावर नसतानाही त्यांनी साठेखत करून दिले आहे. सह दुय्यम निबंधक कार्यालयात या व्यवहाराची कागदपत्रे करण्यात आली. असा व्यवहार करून निबंधक कार्यालयाची फसवणूक झाली असल्याची चर्चा आहे. याबाबत मूळ मालकांनी सह दुय्यम निबंधक अधिकार्‍यांकडे तक्रार केली यामुळे हा व्यवहार वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. बिनताबा साठेखताची नोंद उतार्‍यात घेता येत नाही यामुळे सह दुय्यम निबंधकांनी हे साठेखत केले कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जागेचा व्यवहार यापूर्वी एकाने केला होता. वादग्रस्त जमिनीचा व्यवहार होत असतानाही संबंधित अधिकार्‍यांनी कागदपत्राची पाहणी न केल्याने सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे. मूळ मालकाने या व्यवहाराबाबत तक्रार केल्याने सह दुय्यम निबंधक अधिकारी आता काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. अशाप्रकारचे वादग्रस्त व्यवहार सर्रासपणे होत असल्याची नागरिकांत चर्चा आहे.

संबंधितांना नोटीस बजावणार…
संगमनेर खुर्द परिसरातील जमिनीच्या उतार्‍यावर म. ज. म. अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार हस्तांतरणास बंदी असा उल्लेख आहे. असे असतानाही या जमिनीचे साठेखत करण्यात आले आहे. ही बाब सह दुय्यम निबंधक अधिकार्‍यांच्या नंतर लक्षात आली. यानंतर संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आहे. आपण या व्यवहारापोटी संबंधितांना नोटिसा बजावणार असल्याचे अधिकारी जाधव यांनी सांगितले. या जमिनीचा 2021 सालीही अशाप्रकारे व्यवहार करण्यात आला होता. याचा आधार घेऊन पुन्हा जमिनीचे बिनताबा साठेखत करण्यात आले. याबाबत संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई होणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या