Saturday, November 23, 2024
Homeनगरसंगमनेर तालुक्याचा पठार भाग दोन दिवसांपासून अंधारात

संगमनेर तालुक्याचा पठार भाग दोन दिवसांपासून अंधारात

कनिष्ठ अभियंत्यांकडून वरिष्ठ अभियंत्यांच्या आदेशाला केराची टोपली ?

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कर्जुले पठार अंतर्गत वीज उपकेंद्रातून महावितरण कंपनीने ग्राहकांना दोन दिवसांपासून अंधारात ठेवले असून घारगाव येथील महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांनी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले दोन्ही फोन बंद ठेवून आपली जबाबदारी किती गंभीर आहे याचे दर्शन घडवले. दरम्यान घारगाव या उपकेंद्रातून पठार भागातील सारोळे पठार, सावरगाव घुले, वरुडी पठार, जवळे बाळेश्वर, महालवाडी, गुंजाळवाडी पठार, कर्जुले पठार यांसह 40 गावांना वीजपुरवठा होत असतो. मात्र, कर्जुले पठार विद्युत उपकेंद्रात तांत्रिक बिघड झाला होता.

- Advertisement -

या कनिष्ठ अभियंत्याने याची पूर्वकल्पना आपल्या वरिष्ठांना दिली. त्यानंतर मुख्य अभियंता अनिल थोरात त्याचबरोबर उपकार्यकारी अभियंता पाटील यांना दिली. त्यानंतर त्यांनी कर्मचार्‍यांना सांगून हा विद्युत पुरवठा दोन दिवसानंतर मलमपट्टी करून काही प्रमाणात सुरू केला. या सबस्टेशनला तांत्रिक बिघाड झाल्यानंतर दुरुस्त करणार्‍या ठेकेदारांनाही महावितरण कंपनी कायमच पाठीशी घालत आहे. 24 तास संपूर्ण पठार भाग अंधारात ठेवूनही संबंधित कंत्राटदार कंपनी या उपकेंद्रात येऊन बिघाड दुरुस्त करणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी दिली. भ्रष्टाचाराच्या कुंपणाखाली वावरणार्‍या या कंत्राटदाराला वीज वितरण कंपनीतील अधिकारीच पाठीशी घालत असल्याचा आरोप पठार भागातील नागरिकांनी केला आहे.

अनेक दिवसांपासून या भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असतो. यावर महावितरण कंपनीने उपाययोजना न केल्यास महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा बाबासाहेब कडू यांनी दिला आहे. कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांचे काम समाधानकारक राहिले नाही. ग्राहकांना कायमच अरेरावीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. पठार भागातील अनेक गावांचा आणि शेती पंपांचाही विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

याप्रकरणी या भागाचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्याकडेही ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी केल्या. त्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता थोरात यांना याप्रकरणी लक्ष घालण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र कनिष्ठ अभियंता घारगाव यांनी या आदेशालाही केराची टोपली दाखवली. येथील कनिष्ठ अभियंता दीपक थोरात यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पठार भागातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा महावितरण कंपनीला कोणतीही पूर्वकल्पना देता गावागावातील शेतकरी उपोषणाला बसतील, असा इशारा पठार भागातील नागरिकांनी दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या