Wednesday, February 4, 2026
Homeनगरवार्तापत्र : संगमनेर तालुका खरीप हंगामासाठी सज्ज

वार्तापत्र : संगमनेर तालुका खरीप हंगामासाठी सज्ज

शेतकर्‍यांची जय्यत तयारी तर कृषी विभागाचे नियोजन

संगमनेर तालुका वार्तापत्र | महेश पगारे

मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामाची देखील जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी देखील ट्रॅक्टर व बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीपूर्व मशागती केल्या असून सुमारे 63 हजार हेक्टर क्षेत्रावर विविध खरीप पिकांची पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यासाठी विभागाकडून आवश्यक खतसाठा, बियाणे, आणि कृषी निविष्ठांच्या वितरणाचे बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. मात्र, शेतकर्‍यांना आता दमदार मान्सूनची प्रतीक्षा लागून आहे.

- Advertisement -

संगमनेरच्या तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगामपूर्व नियोजनासाठी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व कृषी सहायकांना आपापल्या गावांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्याचे व माहितीपर बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. शेतकर्‍यांना वेळेवर व योग्य प्रमाणात खते, बियाणे व औषधे मिळावीत यासाठी कृषी विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यंदाच्या हंगामात शेतकरी बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भात, भुईमूग, सोयाबीन व कांदा या पिकांची पेरणी करणार आहेत.

YouTube video player

या पिकांना बाजारपेठेत चांगला दर मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकर्‍यांनी जास्त प्रमाणात या पिकांकडे वळण्याचे संकेत दिले आहेत. काही भागांमध्ये भाताची पारंपरिक शेती केली जाते, तर काही ठिकाणी सोयाबीन व भुईमूग पिकांकडे शेतकर्‍यांचा कल असल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार बहुतांश ठिकाणी टॅक्टरच्या मदतीने तर काही ठिकाणी बैलांच्या साहाय्याने मशागत करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या सर्व पिकांचा अंदाज घेऊन कृषी विभागाने 28 हजार 529 मेट्रिक टन खतांची मागणी केली असून, त्यापैकी 21 हजार 959 मेट्रिक टन खते तालुक्याला उपलब्ध होणार आहेत. तर बियाण्यांच्या बाबततही परवानाधारक विक्रेत्यांकडून पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी फसवणूक टाळण्यासाठी फक्त परवानाधारक कृषी केंद्रांवरूनच बियाणे, खते व औषधे खरेदी करावीत, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

या हंगामात हवामानातील बदल आणि अनपेक्षित पर्जन्यमान यांचा फटका शेतकर्‍यांना बसू नये यासाठी कृषी विभाग वेळोवेळी मार्गदर्शन व इशारे देणार आहे. त्यानुसार शेतकर्‍यांनी पीकपद्धती, जमिनीचा प्रकार, पाणी उपलब्धता आणि बाजारभाव लक्षात घेऊन योग्य पिकांची निवड करावी, असे सांगितले आहे. एकूणच कृषी विभागाकडून जोरदार तयारी केल्याचे दिसून येते.

संगमनेर तालुक्यात अनधिकृतरीत्या बियाणे, खते किंवा कीटकनाशके विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष तालुकास्तरीय भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक कृषी केंद्रांवर अचानक भेट देणार असून, शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार आहे.
– रेजा बोडके (तालुका कृषी अधिकारी-संगमनेर)

ताज्या बातम्या

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम...