संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारातील महादेव मंदिराजवळ कोयत्याने वार करून तरुणाच्या हाताचा पंजा तोडल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.19) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका दिलीप वाकोडे (रा. विडी कामगार सोसायटी, कृष्णा नगर) यांचा मुलगा साई वाकोडे आणि त्याचे मित्र तन्मय गोसावी व तेजस सातपुते हे घुलेवाडीला कुणाल गुंजाळला भेटण्यासाठी जात होते. त्याचवेळी महादेव मंदिरासमोर बंटी अरगडे (रा. अरगडे मळा) व त्याचे दोन अनोळखी साथीदार यांनी साईवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला.
हल्ल्यावेळी साईने बचाव करण्याचा प्रयत्न करत डावा हात मध्ये घातल्याने कोयत्याच्या वाराने थेट त्याच्या डाव्या हाताचा पंजा तुटून खाली पडला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत साईला तत्काळ नाशिकला हलविले. या घटनेची माहिती मिळताच शहराचे निरीक्षक समीर बारवकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. साईची आई रेणुका वाकोडे यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे करत आहेत.




