Wednesday, February 4, 2026
HomeनगरAhilyanagar News : विळदच्या सानिकाची पुणे कारागृह पोलीसपदी निवड

Ahilyanagar News : विळदच्या सानिकाची पुणे कारागृह पोलीसपदी निवड

अहिल्यानगर । प्रतिनिधी

नगर तालुक्यातील विळद गावातील सानिका योगेश शिंदे हिची पुणे येथील कारागृह पोलीस पदावर निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी तिचा आणि तिच्या आई-वडिलांचा सन्मान करून गौरव केला.

- Advertisement -

सानिकाने लहानपणापासून पोलिस दलात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. शेतकरी कुटुंबातून आलेल्या सानिकाला तिच्या वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे मोलाचे पाठबळ लाभले. घरच्या आर्थिक मर्यादा असूनही तिने चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यश मिळवले.

YouTube video player

यापूर्वी झालेल्या पोलिस भरती परीक्षेत काही गुणांनी तिचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र, याचा धैर्याने सामना करत तिने अधिक जोमाने तयारी केली. नुकत्याच पार पडलेल्या कारागृह पोलिस भरतीत तिने उत्तम कामगिरी करत यश मिळवले आणि आपले स्वप्न साकार केले.

सानिकाच्या यशामागे तिच्या मेहनतीबरोबरच योग्य मार्गदर्शनाचेही महत्त्वाचे योगदान आहे. तिला देहरे येथील सैनिक अकॅडमीचे संतोष काळे आणि नगरच्या राजमुद्रा अकॅडमीच्या नंदाताई पांडुळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तिच्या तयारीला योग्य दिशा मिळाली.

शेतकरी कुटुंबातील मुलगी असूनही सानिकाने चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या यशामुळे अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

गावात झालेल्या सत्कार समारंभात ग्रामस्थांनी सानिकाचा सत्कार करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आई-वडिलांचे देखील या प्रसंगी विशेष कौतुक करण्यात आले.

सानिकाच्या या यशाबद्दल गावकऱ्यांपासून ते शिक्षक आणि मित्रपर्यंत सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

सानिकाचे हे यश ग्रामीण भागातील मुलींनाही मोठे स्वप्न पाहता येते आणि ते पूर्ण करता येते, हे सिद्ध करणारे ठरले आहे. तिचा संघर्ष, मेहनत आणि जिद्द इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

 

 

 

ताज्या बातम्या