Friday, November 22, 2024
Homeराजकीयसंजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

शिस्तभंगाची कारवाई होऊन काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी शुक्रवारी तब्बल २० वर्षांनंतर घरवापसी केली आहे. निरूपम यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर काँग्रेसमध्ये राहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार काम करता येत नव्हते. आता ती अडचण दूर झाली असल्याचे निरूपम यावेळी म्हणाले.

- Advertisement -

महाआघाडीच्या लोकसभा जागावाटपात उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली असून काँग्रेस संपत चालली आहे, अशी टीका संजय निरूपम यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या प्रकरणी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर निरुपम हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आज अखेर निरुपम यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात आयोजित कार्यक्रमात निरूपम यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

संजय निरूपम हे त्यांचा परिवार आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले आहेत. हा तर फक्त ट्रेलर आहे,पिक्चर अभी बाकी है. काँग्रेस पूर्णपणे रिकामी झाली आहे. एक धडाडीचा नेता म्हणून संजय निरूपम यांची ख्याती आहे. बाळासाहेबांनी त्यांना दोनदा राज्यसभेवर पाठवले होते. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी उत्तम काम केले, शिवसेनेचे नाव मोठे केले. ते आज स्वगृही परत आले आहेत. ते लोकसभेसाठी इच्छुक होते. माझ्याशीही त्यांची चर्चा सुरू होती. पण मी त्यांना सांगितले की, आमचा उमेदवार ठरला आहे.तुम्ही पक्षासाठी काम करा, महायुतीच्या उमेदवारासाठी काम करा. काही लोक पक्षात येताना मला काय मिळणार, अशी भावना ठेवून येतात. पण त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या राष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या अनुभवाचा शिवसेनेला फायदा होईल, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

तर काँग्रेसमध्ये राहून बाळासाहेबांच्या विचारांवर काम करण्यात अडचण येत होती. पण आता ही अडचण दूर झाली आहे. मला लोकसभा लढायची होती, पण काँग्रेसमध्ये लोकांनी दगाबाजी केली. आता महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी काम करणार आणि त्यांना निवडून आणणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हात मजबूत करण्यासाठी आपण शिवसेनेत आलो आहोत, असे संजय निरूपम यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या