मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता. १३ जानेवारी) सिंचन घोटाळ्याबाबत केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवारांनी २५ वर्ष जुन्या सिंचन घोटाळ्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. १९९९ मध्ये राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा भाजपचा १०० कोटींचा सिंचन घोटाळा समोर आला होता. पुरंदर सिंचन प्रकल्पाच्या खर्चात १०० कोटी वाढीव खर्च लिहा, असे भाजप नेत्यांनी सांगितले असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनीच केल्याचे अजित पवार यांनी मंगळवारी सांगितले. आता यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला आहे. राऊतांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले असून अजित पवारांनी कोडी टाकू नये, कोड्यात न बोलता थेट बोलावे असे म्हंटले आहे.
यावेळी त्यांना अजित पवारांनी केलेल्या विधानाबाबत आणि निवडणुकीत होणाऱ्या वारेमाप पैशांच्या वापराबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊतांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने आजचा दिवस सत्ताधाऱ्यांना दान केला आहे. शिंदे गटाकडे, भाजपकडे, अजित पवारांकडे पैसा आहे. अजित पवारांनी पैसा कुठून येतो हे सांगितले आहे. शेकडो कोटीच्या फाईली बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी कशा आल्या हे त्यांनी सांगितले. हे शिंदेंच्याही बाबतीत आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे निवडणूक आयोग किंवा अँटी करप्शन ब्युरो काय करत आहे? ते काही करणार नाही. अजित पवारांनी कोणती फाईल आली हे अर्धवट सांगू नये. तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊ सांगा, असे आव्हान राऊतांनी दिले आहे.
गणेश नाईकांना आव्हान आहे कोडी टाकू नका
तसेच, गणेश नाईकांना आव्हान आहे की कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असे म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील? हे सांगा. एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि ते पैसे ते आता वाटतात असे फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगतात. मग ते उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. तुम्ही माझे उघड करु नका, मी तुमची नाडी सोडणार नाही असे महाराष्ट्रातील राजकारण्यांचे सुरू असून हे योग्य नाही.
तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून उघड केले पाहीजे
अजित पवारांकडेही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्र कसा लुटला जात आहे याची माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून उघड केले पाहिजे. गुप्तपणे एकमेकांच्या फाईल काढत आहेत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करत आहेत. शिदेंचे काही काढले की ते फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काही बोलले की ते शिंदे, पवारांना ब्लॅकमेल करणार. या महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्तेत ब्लॅकमेल करुन स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे, असा आरोपच यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला आहे.





