मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांचं काल (बुधवारी) बारामती येथे एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आज (गुरुवारी) बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यसंस्काराआधी मुलगा पार्थ पवार आणि जय पवार यांनी धार्मिक विधी आणि पूजा केली. तर पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर दोन्ही मुलांनी अजित पवारांना मुखाग्नी दिला. त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हे देखील वाचा : Ajit Pawar Funeral : ‘कामाचा माणूस’ गेला! अजितदादांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा वहिनी आणि पवार कुटुंबाला ‘असं’ सावरलं
अजित पवारांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये संपूर्ण पानभर जाहिराती प्रसिद्ध केल्या. पंरतु, अजित पवारांच्या हयातीत भाजपने त्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. यावरुन संजय राऊतांनी ट्विट करत भाजपवर टीका केली. त्यांनी “भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या! पण त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.” असे राऊतांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या टीकेवर भाजप काय प्रत्युत्तर देणार हे बघावे लागणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी अजित पवार बारामतीत येणार होते. त्यासाठी सकाळी ८.१० वाजता त्यांच्या विमानाने मुंबईतून उड्डाण केले. ८.४३ वाजता अजित पवार यांचे विमान बारामती येथे उतरणार होते. मात्र, धावपट्टीवर उतरण्याऐवजी अजित पवारांचे हे विमान बाजूच्या शेतात कोसळले आणि प्रचंड मोठा स्फोट झाला. यानंतर अग्निशमन दल आणि आपातकालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर त्यांनी विमानाला लागलेली आग विझवली. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.
हे देखील वाचा : Ajit Pawar Funeral : अलविदा दादा! उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सिंचन घोटाळ्याचे आरोप नेमके आहेत काय?
अजित पवार जलसंपदा मंत्री असताना त्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला, त्यांची जागा तुरुंगात असेल, असा आक्रमक प्रचार भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केला. आघाडी सरकारवर प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप करून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात रान उठवले. लोकांनीही भाजपच्या प्रचाराला साथ देऊन आघाडीचे सरकार घालवले. यानंतर राज्यात भाजपचे सरकार आले. दरम्यानच्या काळात अजित पवारांवर सातत्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचा पुनरुच्चार झाला. २०१९ ला आकडे जुळत नसतानाही शरद पवार यांनी महाविकास आघाडीची मोट बांधून राष्ट्रवादीला सत्तेत बसवले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून बंड केल्यानंतर आघाडीचे सरकार गेले. त्यानंतर काही महिने विरोधी पक्षात काम केल्यानंतर अजित पवारही भाजप सरकारमध्ये सामील झाले. तेव्हा देखील अधूनमधून त्यांच्यावर कधी खासगीत तर कधी उघडपणे भाजपचे नेते बोलत राहिले. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणुकीतही भाजपच्या अनेक नेत्यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्यावरून आरोप केले. यावर बोलताना अजित पवार यांनी ‘ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबतच सत्तेत बसलोय की नाही’, अशी प्रतिक्रिया देत भाजपला डिवचले होते.
हे देखील वाचा : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू




