मुंबई | Mumbai
बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच आता या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की,”महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचं आगतस्वागत, निवडणूक, शिबीरं यामध्ये सरकार गुंतून पडले आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चाललं आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सामान्य जनता सुरक्षित नाही. घरात, झोपड्यांमध्ये लोक घुसत आहेत. आता कलाकारांच्या घरांमध्ये चोर घुसत आहेत आणि हल्ला करत आहेत. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का आहे. १५ दिवसांपूर्वी सैफ अली खान सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीला गेले होते आणि पंतप्रधानांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक तास व्यतीत केला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला, तो चोरांनी केला की कोणी केला? हा पुढचा प्रश्न आहे. पण या राज्यात कोणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणे मुश्किल झाले आहे. हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे”, अशी टीकाही यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
तसेच “राज्यातील ९० टक्के पोलीस (Police) फुटलेले आमदार, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख यांच्या संरक्षणासाठी दिले जातात. मात्र,येथे सामान्य माणसाला सुरक्षा नाही, पण गद्दार, बेईमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना सुरक्षा आहे. सैफ अली खानला देखील सुरक्षा असणार, त्याला भारत सरकारने पद्मश्री दिलेला आहे. पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही हे आज पुन्हा एकदा दिसून आले आहे. सैफ अली खानवर झालेला हल्ला (Attack) गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडे पडले आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हटले.