दिल्ली । Delhi
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत महाराष्ट्र अनेक चर्चा सुरू आहेत. एकीकडे मुख्यमंत्रिपदावरून महायुतीचे नेते दिल्लीच्या वाऱ्या करत असून मंत्रिपदावरूनही राजकारण सुरू आहे.
तर, दुसरीकडे विरोधकांनी महायुतीमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींवरून निशाणा साधला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.
दरम्यान काल एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. ज्यात एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसून आली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आले.
याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, उगवता सूर्य आणि मावळती सूर्य यात फरक असतोच. उगवत्या सूर्याचे तेज एका बाजूला दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला मावळतीचा सूर्य आहे. मावळतीचा सूर्य झुकताना, वाकताना आणि ढगाच्या आड जाताना दिसत आहे. शेवटी हे राजकारण आहे. ते चंचल असते, त्यात काय होईल? हे सांगता येत नाही.
तसेच, अजित पवार हे कायम उपमुख्यमंत्री आहेत. ते भावी किंवा माजी नसतात, ते सदैव उपमुख्यमंत्री असतात. हे कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पाहायला मिळत आहे. दिल्लीत ते गॉगल बिगल लावून, कोट घालून फिरत आहेत. खरंतर त्यांचे हे हास्य लोकसभा निकालानंतर मावळले होते. पण आता ते खूश दिसत आहेत.